(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vishwajeet Kadam : निवडणुका आल्याने सत्ताधाऱ्यांकडून दंगलीचे कटकारस्थान, साताऱ्यातील पुसेसावळीची घटना निषेधार्थ; विश्वजित कदमांची टीका
धनगर आणि मराठा आरक्षण बाबतीत गैरसमज पसरवण्याचे कटकारस्थान केलं जात आहे, पण त्याला आपण बळी पडू नका, असे आवाहन करत येणाऱ्या काळात आपण सावध असलो पाहिजे, असं मत देखील आमदार कदम यांनी व्यक्त केले.
सांगली : अलीकडील काळात देशात निवडणुका जवळ आल्या की सत्ताधारी जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करून दंगली करण्याचा कट कारस्थान करतात, असा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी भाजप सरकारवर केला. सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथील घटना हे दुर्दैवी असून त्याचा आपण निषेध करत असल्याचे आमदार कदम यांनी स्पष्ट केलं आहे. काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेच्या समारोप प्रसंगी कदम माध्यमांशी बोलत होते. धनगर आणि मराठा आरक्षण बाबतीत गैरसमज पसरवण्याचे कटकारस्थान केलं जात आहे, पण त्याला आपण बळी पडू नका, असे आवाहन करत येणाऱ्या काळात आपण सावध असलो पाहिजे, असं मत देखील आमदार कदम यांनी व्यक्त केले.
काँग्रेसकडून सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या जनसंवाद पदयात्रेची सांगली शहरात सांगता झाली. 9 सप्टेंबरपासून माजी कृषी राज्यमंत्री आमदार विश्वजीत कदम आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची ही पदयात्रा सुरू होती. या यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधण्यात आला. गेल्या 6 दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या जनसंवाद यात्रेचा सांगली शहरात भव्य पदयात्रेने समारोप झाला. यावेळी पार पडलेल्या सांगता सभेत काँग्रेस नेत्यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली.
लोकसभेची निवडणूक दुसरी स्वातंत्र्य लढाई
दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांची कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील वडणगेमध्ये जनसंवाद पदयात्रा पार पडली. यावेळी झालेल्या सभेमध्ये बोलताना त्यांनी भाजपवर हल्ला चढवला. लोकसभेची निवडणूक ही दुसरी स्वातंत्र्य लढाई असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना म्हणाले की, देशाची स्थिती अराजकतेकडे निघाली आहे, कर्जाचा बोजा वाढत आहे. देशामध्ये धार्मिक आणि जातीय तेढ मुद्दाम वाढवली जात आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा सत्तेत आल्यास पुढील विधानसभा निवडणूक होणार नाही. देशात नरेंद्र मोदी यांच्याविरोधात देशात वातावरण आहे. काँग्रेसवर सामान्य माणसाचा विश्वास आहे.
गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत 50 टक्क्यांपेक्षा जास्त भाजप विरोधात मतदान केले. मात्र, ही मते विखुरल्याने 30 टक्के मते घेणारे मोदी सत्तेत आले. असे होऊ नये म्हणूनच 28 पक्षांची मोट बांधून इंडिया आघाडी स्थापन केल्याचे ते म्हणाले. त्यामुळे देशाचे नाव बदलून बदलून भारत करण्याचा विचार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या