UPSC 2022 Results: मायबोली मराठीतून शिकलेल्या आशिष पाटलांचा UPSC मध्ये सलग दुसऱ्यांदा इंग्रजीतून डंका! दाखवून दिला ग्रामीण भागातील जिद्दीचा कोल्हापुरी 'पॅटर्न'
UPSC कडून 2022 मधील निकाल जाहीर झाला. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून आशिष पाटील यांनी सलग दुसऱ्यांदा तब्बल 100 रँक सुधारत 463 व्या रँकने उर्तीर्ण होत ग्रामीण भागातील प्रतिभेवर शिक्कामोर्तब केलं आहे.
Ashish Patil from kolhapur in UPSC: मायबोली मराठी अन् राज्याच्या ग्रामीण भागातील गुणवत्तेकडे नेहमीच संशयाने पाहणाऱ्या पांढरपेशी वृत्तीला सणसणीत चपराक ठरेल, असे निर्भेळ यश कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील साळशी येथील आशिष अशोक पाटील यांनी प्राप्त केलं आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून सन 2022 मधील निकाल जाहीर झाला. या परीक्षेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून आशिष पाटील यांनी सलग दुसऱ्यांदा तब्बल 100 रँक सुधारत 463 व्या रँकने उर्तीर्ण होत ग्रामीण भागातील प्रतिभेवर शिक्कामोर्तब केलं आहे.
मायबोली मराठीत शिकल्याचा कोणताही न्यूनगंड मनात न बाळगता त्यांनी इंग्रजीतून युपीएससी गवसणी घालत इंग्रजी भाषेचा अनावश्यक दबाव घेणाऱ्यांना एक आदर्श घालून दिला आहे म्हटल्यास अतिशयोक्ती ठऱणार नाही. स्वत: आशिष पाटील यांनी इंग्रजी फक्त भाषा आहे आणि तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर आत्मसात करू शकता, अशी प्रतिक्रिया एबीपी माझाशी बोलतना दिली. सध्या ते दिल्लीत उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत. यश मिळवण्यासाठी तीन प्रयत्न करण्याचा निश्चय मनाशी केला होता. यामध्ये यश आले नसते, इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केल्याने काॅर्पोरेट जगतातून करिअर करणार होतो, असेही त्यांनी नमूद केले. प्रशासकीय सेवेचं स्वप्न पाहणाऱ्यांकडे कोणत्याही परिस्थितीत प्लॅन बी असायलाच हवा, असेही त्यांनी सांगितले.
सलग दुसऱ्यांदा निर्भळ यश
सन 2021मध्येही आशिष पाटील यांनी पहिल्यांदा आलेल्या अपयशातून बिलकूल खचून न जाता कोरोना महामारीत घरूनच जोमाने अभ्यास करत 563 व्या रँकने उर्तीर्ण झाले होते. मात्र, देशसेवेचा वसा घेतलेल्या आशिष पाटील यांचे आयएएस होण्याचे स्वप्न असल्याने चालूवर्षी कोणताही खंड पडू न देता त्यांनी एकाग्र बुद्धिमतेने अभ्यास करताना तब्बल 100 क्रमाकांनी रँक सुधारताना 463 वी रँक चालू वर्षात प्राप्त केली. या निकालामुळे त्यांना आयपीएस रँक निश्चित असली, तरी आयएएस होण्यासाठी पुन्हा नव्याने प्रयत्न करणार आहेत.
मायबोली मराठीतून शिक्षण अन् इंग्रजीतून डंका
आशिष पाटील यांनी सलग दुसऱ्यांदा मिळवलेल्या यशाने कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. निकाल जाहीर होताच प्राथमिक शिक्षक असलेल्या वडिल अशोक पाटील यांचा एका बापाला आणखी आनंद काय असू शकतो, अशी प्रतिक्रिया दिली. एबीपी माझाने आशिष पाटील आणि त्यांचे वडिल अशोक पाटील यांच्याशी संवाद साधला. आशिष पाटील यांनी यशाला गवसणी कशी घातली? मुलाखतीमधील सर्वांत कठिण अनुभव कोणता होता, अभ्यास करण्याची पद्धत कशी होती? याबाबत त्यांना एबीपी माझाने जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
शाहुवाडीसारख्या दुर्गम भागात मायबोली मराठीतून शिक्षण
आशिष पाटील यांनी आपले पहिली ते चौथीचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील विद्यामंदिर वीरवाडीतून पूर्ण केले. चौथीच्या स्काॅलरशिपमध्ये आशिष यांनी राज्यात तिसरा क्रमांक पटकावला होता. पाचवी ते सातवीचे शिक्षण सुपात्रेमधील न्यू इंग्लिश स्कूलमधून पूर्ण केले. त्यांनी सातवीच्या स्काॅलरशीपमध्ये बाजी मारली होती. आठवी ते दहावीचे शिक्षण त्यांनी महात्मा गांधी हायस्कूल बांबवडेमधून करताना दहावीमध्ये 97 टक्के गुणांनी उर्तीर्ण झाले होते. त्यानंतरचे शिक्षण त्यांचे पुण्यातून झाले. अकरावी आणि बारावी त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून करताना काॅलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून 2019 मध्ये बी. टेकचे शिक्षण पूर्ण केले.
इंजिनिअरिंगनंतर स्पर्धा परीक्षेकडे वळले, कोरोना महामारीत घरातून अभ्यास
आशिष यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यांना पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर त्यांनी खचून न जाता कोरोना महामारीत घरातून अभ्यासाला सुरुवात केली. कोरोना महामारीमुळे आशिष पाटील यांना दिल्लीत अवघा तीन महिन्यांचा कालावधी मिळाला. त्यानंतर लाॅकडाऊनच्या काळात पूर्णवेळ घरीच थांबून अभ्यास करून 2021 मध्ये 563 वी रँक मिळवली होती. त्यानंतर त्यांनी ज्ञान प्रबोधिनीतून अभ्यासास सुरुवात केली. त्यानंतर पुन्हा त्यांनी जोमाने अभ्यास करत सलग दुसऱ्या वर्षी यश प्राप्त करताना तब्बल 100 रँक सुधारत 463व्या रँकने उतीर्ण झाले आहेत. त्यामुळे त्यांना आयपीएस रँक निश्चित आहे.
दमदार यशावर आशिष पाटील म्हणतात..
आशिष पाटील म्हणाले की, गेल्यावर्षी रँकमध्ये आल्याने यावर्षी ऑल इंडिया रँक मिळेल हे मला अपेक्षित होतं. थोडे प्रयत्न कमी पडले, पण मला आयपीएस रँक निश्चित मिळेल. त्यामुळे आयएएस रँकसाठी मी पुन्हा प्रयत्न करणार आहे. मराठीत शिकून इंग्रजी भाषा निवडल्याने दडपण आले होते का? असे विचारले असता ते म्हणाले की, पहिल्यांदा न्यूनगंड वाटणे साहजिक आहे, पण तसा न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. मी दहावीतून अकरावीत गेल्यानंतर सर्व इंग्रजीतून होते. त्यामुळे खरा प्रयत्न त्याठिकाणी करावा लागला. त्यानंतर सलग इंग्रजी असल्याने सहजपणा येत गेला. दहा वर्ष मराठीतून शिकल्यानंतर इंजिनिअरिंग इंग्रजीतून केल्यानंतर भीती बाळगण्याची गरज नाही. इंग्रजी फक्त भाषा आहे ती तुम्ही कधीही शिकू शकता. वेगळ्या प्रयत्नांची गरज नाही. इंग्रजीमध्ये पर्याय अनेक असल्याने माझ्यासाठी नैसर्गिक पर्याय झाल्याचेही त्यांनी सांगितले.
प्लॅन बी असायलाच हवा
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना प्लॅन बी असावाच अशी प्रतिक्रिया आशिष पाटील यांनी दिली. स्वत:चा अनुभव सांगताना म्हणाले की, मला पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही, पण दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी झालो. तीन प्रयत्न करायचे हे मी ठरवले होते आणि कोणतीच पोस्ट मिळाली नाही, तर मी एबीए करून काॅर्पोरेटमध्ये रुजू होण्याचा प्लॅन केला होता, असेही त्यांनी सांगितले.
कुटुबीयांचे मोठे योगदान
वडिल प्राथमिक शिक्षक असल्याने त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. या यशामध्ये त्यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. आईचेही पाठबळ मिळाल्याचे ते म्हणाले.
अभ्यास कोणत्या पद्धतीने केला?
पहिल्यांदा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा मी घरीच होतो, असे आशिष पाटील म्हणाले. दोन वर्ष घरीच बांबवडेत अभ्यास केला. तेव्हा दररोज 9 तास अभ्यास केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामध्ये तीन तीन तासांचा गट करून अभ्यास केला. अभ्यासात सातत्य असायला हवे. दुसऱ्या प्रयत्नांसाठी आशिष पाटील यांनी पुण्यात ज्ञान प्रबोधिनीत अभ्यास केल्याचे सांगितले. त्यांना गेल्यावर्षी मिळालेल्या रँकमुळे सेवेतही दाखल व्हावे लागले होते. त्यानंतर ट्रेनिंग सुरु असतानाच अभ्यास केल्याचे ते म्हणाले. सध्या ते दिल्लीत उपजिल्हाधिकारी आहेत.
निर्णय स्वत: घ्या
आपल्याला कोणी सांगत आहे म्हणून निर्णय घेत आहे की तुम्ही स्वत: निर्णय घेत आहात याचा पहिल्यांदा विचार करा. अन्यही पर्यायही उपलब्ध होत आहेत. तुम्हाला तुमचे क्षेत्र कळाले पाहिजे.
यापेक्षा मोठं यश कुठल्याच बापाला असू शकत नाही
मुलाच्या देदीप्यमान यशावर बोलताना प्राथमिक शिक्षक असलेले अशोक पाटील म्हणाले की, त्याची मातृभाषा मराठी असताना त्याने इंग्रजीची निवड केली. मुलाने मिळवलेलं यश पाहता यापेक्षा मोठा आनंद बापाला असू शकत नाही. त्याने गेल्यावर्षी रँक काढल्यानंतर पुन्हा तीच रँक काढण्यासाठी कुटुंबाची सुद्धा मानसिकता लागते. आम्ही त्याला जाणीव होऊ दिली नाही. यश आणि अपयश स्वीकारण्याची तयारी ठेवायची असते ती आम्ही ठेवली. ग्रामीण भागातील एखाद्या जिल्ह्याचं नेतृत्व करणार आहे, अधिकारवाणीनं बोलणार आहे याचं आम्हाला समाधान आहे. अशोक पाटील सद्या विद्यामंदिर सावेमध्ये प्राथमिक शिक्षक आहेत.
हे सुद्धा नक्की वाचा