Kolhapur Rain : परतीचा पाऊस कोल्हापूरची पाठ सोडेना; वीजांच्या गडगडाटांसह सलग दुसऱ्या दिवशी 'कोसळधारा'
Kolhapur Rain : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाचा कहर सुरुच आहे. काल मंगळवारी तब्बल चार तास धुमाकूळ घातल्यानंतर आजही परतीच्या पावसाने कोसळधारा सुरुच ठेवल्या.
Kolhapur Rain : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाचा कहर सुरुच आहे. काल मंगळवारी तब्बल चार तास धुमाकूळ घातल्यानंतर आजही परतीच्या पावसाने कोसळधारा सुरुच ठेवल्या. त्यामुळे जिल्ह्यातील काढणीला आलेली पिके संकटात आली आहेत.
कोल्हापूर शहर परिसरात सायंकाळी पाच वाजल्यापासून ढग दाटून आले. त्यानंतर वीजांच्या गडगडाटांमध्ये पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सायंकाळी शहरात अंधार पसरल्यासारखी स्थिती निर्माण झाली. पाचच्या सुमारास झालेल्या पावसाने तब्बल सव्वा तास झोडपून काढले. त्यामुळे त्याचा परिणाम वाहतुकीवरही झाला. कोल्हापूर जिल्ह्याला 13 ऑक्टोबरपर्यंत हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. सलग होत असलेल्या वादळी पावसाने तोंडाला आलेल्या पीकांची मात्र दैना होत आहे.
जिल्ह्यात ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून सोयाबीन आणि भात कापणीला वेग आला आहे. त्यामुळे सुगी सुरु असतानाच पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीनला मोड येण्याची भीती आहे. दुसरीकडे शेतातील भात पीक झोपल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. जिल्ह्यात सोयाबीनची लागवड हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. दुसरीकडे करवीर, कागल तालुक्यात भुईमुगाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.
सहाय्यक कृषी अधिकारी मकरंद कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार पीक परिपक्व होण्याच्या अवस्थेत पाऊस पडल्याने धान्य आणि बियाणे यांची वाढ थांबते. गुणवत्ता ढासळते आणि शेतकर्यांना उत्पादनात नुकसान होते. लवकरात लवकर हाताला आलेल्या पिकांची कापणी करावी आणि कापणी केलेली पिके शेडमध्ये ठेवावीत, असा सल्ला आम्ही देत आहोत. कृषी विभागानेही शेतकऱ्यांना भुईमूग आणि भात काढणीचा सल्ला दिला आहे.
ऊस गळीत हंगाम लांबण्याची शक्यता
दुसरीकडे पावसाने हाहाकार केल्याने ऊस गळीत हंगाम सुद्धा लांबण्याची शक्यता आहे. राज्यात ऊस गळीत हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरु होणार असला, तरी परतीचा पाऊस थैमान घालत असल्याने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. शिवारात पाणीच पाणी झाल्याने ऊस वाहतूक करताना मोठ्या संकटांना सामोरे जावं लागण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या