मुश्रीफांच्या विरोधात समरजित घाटगेंसाठी शरद पवारांचं जाळं? एकाचवेळी देवेंद्र फडणवीस-अजितदादा चेक मेट होणार?
Samarjit Ghatge Vs Hasan Mushrif : अजितदादांसोबत गेलेल्या पहिल्या फळीतील नेत्यांपैकी एक म्हणजे हसन मुश्रीफ. कोणत्याही परिस्थिती त्यांना चितपट करायचं असा प्लॅन शरद पवार गटाकडून आखला जातोय.
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीचे ढोल वाजू लागल्यामुळे सर्वच पक्षांनी आता जोरदार तयारी सुरू केली आहे. कुठून कुणाला उमेदवारी द्यायची यांची गणितं आता मांडली जात आहेत. त्याचाच भाग म्हणून शरद पवारांनी कोल्हापूरच्या कागलमध्ये एकाचवेळी फडणवीस आणि अजित पवारांना धक्का देण्याचा प्लॅन केल्याचं बोललं जातंय. जित पवारांचे खंदे समर्थक असलेल्या हसन मुश्रीफांना तगडा चेक मेट देण्यासाठी शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय असलेल्या समरजित घाटगेंनाच (Samarjit Ghatge) ऑफर दिल्याची चर्चा रंगतेय.
अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार त्यांचे प्रत्येक पाऊल आर या पार अशा आवेगानंच टाकताना दिसत आहेत. त्यातच लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाची असमाधानकारक कामगिरी आणि शरद पवार गटाची सरशी यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार अत्यंत हुशारीने प्रत्येक चाल चालताना दिसतात. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूरच्या कागल मतदारसंघावर शरद पवारांनी खास लक्ष दिल्याचं बोललं जातंय. कारण, तिथून लढण्यासाठी शरद पवार गटाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे असलेल्या समरजित घाटगे यांना गळ घातल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे. याचाच अर्थ अजित पवारांचे खंदे समर्थक असलेल्या हसन मुश्रीफांना तगडा चेक मेट देण्याचा शरद पवारांचा डाव असल्याची चर्चा आहे.
कशी आहे समरजित घाटगेंची कारकीर्द?
सीए असलेले समरजित घाटगे 2019 साली भाजपात आले. समरजित घाटगे हे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत. पण, 2019 साली सेना-भाजप युतीमुळे तिकीट मिळालं नाही. त्यामुळे विधानसभेला बंडखोरी करत हसन मुश्रीफांविरोधात अपक्ष लढले. पण, त्यांचा पराभव झाला. मात्र, पहिल्या निवडणुकीत 90 हजार मतं मिळवत त्यांनी लक्ष वेधलं.
आता 'बदल हवा तर आमदार नवा' म्हणत आता समरजित घाटगेंनी पुन्हा एकदा विधानसभेसाठी रणशिंग फुंकलंय. पण हसन मुश्रीफ हे विद्यमान आमदार असल्याने महायुतीतून त्यांना कितपत संधी मिळेल याबद्दल साशंकता आहे. नेमकी हीच संधी साधत आता शरद पवार गटाने समरजित घाटगेंना मैदानात उतरवण्याचा प्लॅन केल्याचं समतंय.
काय म्हणाले समरजित घाटगे?
समरजित घाटगे यांच्या नावाची चर्चा सुरू असताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार गटामध्ये तशी चर्चा सुरू आहे. मात्र, मी कोणताही प्रतिसाद दिला नाही. उमेदवारीबाबत सगळ्या चर्चा माध्यमांवरच बघत आहे अशी प्रतिक्रिया समरजित घाटगे यांनी दिली.
एकीकडे समरजित घाटगेंनी भविष्यातील भूमिकेबाबत वक्तव्य केलेलं नसलं तरी हसन मुश्रीफ यांनी मात्र निवडणूक कशीही झाली तरी आपणच आमदार होणार, असं वक्तव्य केलं आहे. कुणीही लढा, मी चिंता करत नाही असं ते म्हणाले.
शरद पवारांकडून हसन मुश्रीफ टार्गेटवर
कोल्हापूरच्या कागलच्या जागेवरून अजित पवार गटाची मदार हसन मुश्रीफ यांच्यावर आहे. आणि हसन मुश्रीफ हे बंडानंतर अजित दादांसोबत जाणारे पहिल्या फळीतील नेते आहेत. त्यामुळे त्यांना शरद पवार गट टार्गेट करणार हे स्वाभाविक आहे. त्यासाठी शरद पवार गट समरजित घाटगेंचा पत्ता टाकण्याचे प्रयत्न करतोय. याचाच दुसरा अर्थ असा की, शरद पवार गट एकाचवेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना चेकमेट देण्याची तयारी करतोय, हे उघड आहे. मात्र, त्याला आता समरजित घाटगे कसा प्रतिसाद देतात, हे पाहायला हवं.
ही बातमी वाचा: