बंटी म्हणतात, पी. एन. पाटलांनी लढावं आणि पी. एन. म्हणतात बंटी पाटलांनी लढावं; आता तिसरा उमेदवार कोण मला माहीत नाही; हसन मुश्रीफांची कोपरखळी
थेट पाईपलाईन योजना अंतिम टप्प्यात आली आहे. विजयदशमीदिवशी हे पाणी पुईखडीच्या ठिकाणी येईल. मी पालकमंत्री असताना हे पाणी कोल्हापूरकरांना मिळतंय हे माझं भाग्य समजतो, अशी प्रतिक्रिया मुश्रीफ यांनी दिली.
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी (Kolhapur Loksabha) बंटी पाटील (Satej Patil) म्हणतात पी एन पाटील (P. N. Patil) यांनी लढावं आणि पी एन पाटील म्हणतात बंटी पाटील यांनी लढावं. आता त्यांच्याकडे तिसरा उमेदवार कोण आहे मला माहित नाही, अशी कोपरखळी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif on Kolhapur Loksabha) यांनी मारली. ते आज कोल्हापुरात बोलत होते.
मुश्रीफ यांनी मनपाच्या 21 विषयांच्या प्रश्नाचा आढावा घेतला. ते म्हणाले की, पंचगंगा नदीचे प्रदूषित पाणी प्यायला लागत आहे. त्यामुळे काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईन राबवली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावेळी योजनेला मान्यता दिली होती. आज घडीला ही योजना अंतिम टप्प्यात आली आहे. विजयदशमीदिवशी हे पाणी पुईखडीच्या ठिकाणी येईल. मी पालकमंत्री असताना हे पाणी कोल्हापूरकरांना मिळतंय हे माझं भाग्य समजतो. यावेळी नव्या पाण्याने दिवाळीचे अभ्यंगस्नान करता येणार आहे.
जिल्हाधिकारी यांना इतकं दिव्य ज्ञान कसं झालं?
मुश्रीफ यांनी सांगितले की, मनपात रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दिवस 26 दिवसांवरून 18 दिवस करण्यात आले आहेत. इतक्या कमी दिवसात काम करून संसार कसे चालतील? त्यांनी हे कामाचे दिवस कमी का केले? याची माहिती घ्या म्हणून सांगितले आहे. शिवाय कामाचे दिवस पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी यांना इतकं दिव्य ज्ञान कसं झालं? त्यांच्याकडे तर तात्पुरता चार्ज होता, असा टोलाही त्यांनी लगावला.
कोल्हापूर शहरात 100 इलेक्ट्रिक गाड्या आणाव्या लागतील
ते पुढे म्हणाले की, घनकचऱ्यासाठी सरकारकडून जो निधी लागेल तो दिला जाईल. तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी जो निधी मंजूर आहे तो निधी लवकरच दिला जाणार आहे. कोल्हापूर शहरात 100 इलेक्ट्रिक गाड्या आणाव्या लागतील, त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन. इलेक्ट्रिक गाड्या आल्याशिवाय केएमटी तोट्याच जायचं थांबणार नाही. परिख पूल दुरुस्तीसाठी 3 कोटी 88 लाख दिले जाणार आहेत. नवरात्रोत्सवापूर्वी सर्व रस्ते चकाचक केले जातील.
आंदोलन करून वेळ वाया घालवू नये
हसन मुश्रीफ यांनी हद्दवाढीवर भूमिका मांडली. जिथं वाद नाही ती गावं आधी शहरात घेतली जाणार आहेत. त्या गावांचा विरोध आहे त्या गावांचा समावेश यात नाही, त्यांनी उगाचच आंदोलन करून वेळ वाया घालवू नये, असेही ते म्हणाले. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनावणी बाबत मला माहिती नाही, याबाबतचे सर्व काम प्रफुल्ल पटेल पाहत आहेत. यासंदर्भातील माहिती घेऊन बोलणं योग्य होईल, असेही त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या