Dhairyasheel Mane : 'त्या' मुलांवर कारवाई नको, माझा विकासावर फोकस; ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी रस्त्यात जाब विचारल्यानंतर खासदार धैर्यशील मानेंची प्रतिक्रिया
Dhairyasheel Mane : शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांचा चंदूरमध्ये ताफा अडवून साहेब गद्दारी का केली? अशी विचारणा काल (8 मार्च) चंदूरमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी केली होती.
Dhairyasheel Mane : शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांना चंदूरमध्ये ताफा अडवून साहेब गद्दारी का केली? अशी विचारणा काल (8 मार्च) चंदूरमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी केली होती. यावेळी पोलिसांनी हटवल्यानंतर शिवसैनिकांनी 50 खोके, एकदम खोकेच्या घोषणा दिल्या होत्या. या झालेल्या प्रकारानंतर शिंदे गट आणि आणि ठाकरे गट कोल्हापुरात एकमेकांना आव्हान देण्याची भाषा करू लागले होते. यानंतर धैर्यशील माने यांनी आता प्रतिक्रिया देत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ही वेळ राजकारणाची नसून त्या मुलांवर (रस्त्यात थांबवून जाब विचारलेले शिवसैनिक) कारवाई करू नका, असे पोलिसांना सांगितल्याचे धैर्यशील माने म्हणाले.
पण त्या ठिकाणी गोंधळ झाला
त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, मी गेल्या चार महिन्यांपासून मतदारसंघात सातत्याने संपर्कात आहे. माझ्यासोबत पोटतिडकीने काम केलेली तरुणाई काल माझ्यासमोर आली. त्यांनी माझ्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. माझी त्यांच्याशी गाडीतून खाली उतरून बोलण्याची इच्छा होती, पण त्या ठिकाणी गोंधळ झाला.
मला विकासावर फोकस करायचा आहे
ते पुढे म्हणाले की, त्यांना माझ्याशी बोलायचं होतं, त्यासाठी ते आले असतील, त्यावरून आमच्या जुन्या सहकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या. मला वाद प्रतिवादमध्ये पडायचं नाही, मला विकासावर फोकस करायचा आहे. फडणवीस आणि शिंदेंचा विकासाचा अजेंडा आहे तो गावागावात घरात पोहोचण्यासाठी मी कुठंही हलणार नाही. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा सर्वागिण विकासासाठी माझं काम सुरु आहे.
त्या मुलांवर कारवाई करायची नाही
आमच्याकडेही सांगितलं आहे, प्रतिक्रिया द्यायची नाही, त्या मुलांवर कारवाई करायची नाही. जी गोष्ट घडली त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या कामाला लागायचं आहे. आपण विधायक कामाकडे वळू असे दोन्हीकडे सांगितले आहे. आताची वेळ राजकारणाची नाही. केंद्र आणि राज्य पातळीवर निधी आणून काम करत असताना आपल्या सहकार्याची गरज आहे, मी एका पार्टीचा प्रतिनिधी नाही, सर्वांचा लोकप्रतिनिधी आहे. सर्वांच्या विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जात आहे.
मुरलीधर जाधवांकडून थेट आव्हान
शिंदे गटातील राहुल चव्हाण यांच्याकडून भाडोत्री शिवसैनिक असा उल्लेख केल्यानंतर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी थेट आव्हान दिले. ते म्हणाले की, गद्दारी का केली? अशी विचारणा करणाऱ्या शिवसैनिकांचे अभिनंदन करतो. त्याचे मी समर्थन करतो. भाडोत्री शिवसैनिक म्हणतात, पण स्वत:ची भाकरी खाऊन, तेल टाकून त्यांनी काम केलं आहे. राहुल चव्हाणला शिवसेना काय माहित आहे? याला काय माहित आहे? ओपन चॅलेंज करतो, वेळ, काळ आणि ठिकाण सांगावं. कोण कोणाला भारी पडतं ते ताकदीनिशी सांगतो. केसाला धक्का लावण्याचा प्रयत्न केल्यास धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता.
इतर महत्वाच्या बातम्या