Kolhapur Police : तब्बल 8 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारीच अटकेत, कोल्हापुरात एपीआय आणि कॉन्स्टेबलच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime News : सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश म्हात्रे आणि कॉन्स्टेबल रुपेश कुंभार या दोघांना सांगली आणि कोल्हापूर येथील लाचलूचपत प्रतिबंधक पथकाने आज मध्यरात्री अडीच वाजता सापळा रचून जेरबंद केले.
Kolhapur Police Corruption : कोल्हापूर पोलीस (Kolhapur Police) दलातील पोलीस अधिकाऱ्यांनाच तब्बल 8 लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर पोलीस दलातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील लाचखोर एपीआय आणि आणि कॉन्स्टेबलच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. तब्बल 8 लाखांची लाच स्वीकारताना दोघांना कोल्हापूर आणि सांगलीच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना जेरबंद केलं. आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये 8 लाख रुपयांची लाच घेताना जुना राजवाडा पोलीस ठाण्याचा सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश म्हात्रे आणि कॉन्स्टेबल रुपेश कुंभार या दोघांना सांगली आणि कोल्हापूर येथील लाचलूचपत प्रतिबंधक पथकाने मध्यरात्री अडीच वाजता सापळा रचून रंगेहाथ अटक केली. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली.
सांगली येथील तक्रारदारांमध्ये या संदर्भात सांगली येथील एसीपी पथकाकडे तक्रार दाखल केली होती. या पडताळणीनंतर पथकाने ही कारवाई केली. सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांसह कॉन्स्टेबल लाच प्रकरणी ताब्यात घेतल्याने कोल्हापूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
‘सीपीआर’च्या वरिष्ठ लिपिकाला पाच हजारांची लाच घेताना अटक
दरम्यान, अवघ्या दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात नोकरीतील पुढील लाभ मिळण्यासाठी स्थायित्व प्रमाणपत्र दिलं म्हणून पाच हजारांची लाच स्वीकारताना ‘सीपीआर’मधील वरिष्ठ लिपिकाला आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. हुसेनबाशा कादरसाब शेख असं त्याचं नाव आहे. तक्रारदार या ‘सीपीआर’मध्ये अधिपरिचारिका पदावर नोकरीला आहेत. त्यांना नोकरीत कायम होण्यासाठी स्थायित्व प्रमाणपत्राची आवश्यकता होती. त्याकरीता त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे लेखी अर्ज केला होता. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या सहीचे स्थायित्व प्रमाणपत्र त्यांना वीस दिवसांपूर्वी कार्यालयातील वरिष्ठ लिपिक शेख याने दिले होते. त्या बदल्यात त्याने पाच हजारांची लाच मागितली होती. ही लाच स्वीकारताना आज दुपारी त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.
लाच प्रकरणी शिरोळचे मुख्याधिकारी, अभियंता, लिपिक जाळ्यात
त्यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यामध्येच शिरोळ नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पावणे दोन लाख रुपयांच्या लाच प्रकरणी लाचलुचपत विभागाने पकडले होते. अभिजीत मारुती हराळे असे मुख्याधिकाऱ्याचे नाव आहे. एसीबीने हराळेसह चौघांना ताब्यात घेतले आहे. तक्रारदाराची बांधकाम परवाना फाईल तपासून पुढे पाठविण्यासाठी कनिष्ठ अभियंता संकेत हंगरगेकर आणि लिपक सचिन सावंत यांनी तक्रारदाराकडे एक लाख रुपये लाचेची मागणी केली. मुख्याधिकारी अभिजीत हराळे यांनी तक्रारदाराची फाईल मंजूर करून बांधकाम परवाना देणेसाठी 75 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने कोल्हापूर एसीबीकडे धाव घेत तक्रार केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या