Kolhapur Municipal Corporation : मुंबई मनपाचा निर्णय इतर मनपांना लागू होणार की नाही? निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर मनपात चार सदस्यांचा एक प्रभाग झाल्यास चार सदस्य 20 प्रभाग तर एक सदस्य असलेला एक प्रभाग होऊ शकतो त्यासाठी किमान तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागू शकतो.
Kolhapur Municipal Corporation : महाविकास आघाडी सरकारच्या काळातील बृहन्मुंबई महापालिकेची (BMC) प्रभाग संख्या वाढवण्याचा निर्णय रद्द केला आहे. पूर्वरत प्रभाग रचना करण्याच्या राज्य सरकारच्या नव्या अध्यादेशाला मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं दिलेलं आव्हान फेटाळून लावण्यात आलं आहे. त्यामुळे हा निर्णय राज्यातील निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व महानगरपालिकांना लागू होणार की नाही? याकडे आता लक्ष आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून याबाबत आठवडाभरात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. राज्यात कोरोना महामारी तसेच राजकीय खेळखंडोब्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे या सर्व निवडणुका पावसाळ्यानंतर होण्याचीच शक्यता वर्तवली आहे.
कोल्हापूर महापालिकेमध्येही 81 सदस्यांसाठी पुन्हा प्रभाग पद्धती नव्याने करावी लागणार आहे. एक प्रभाग तीन किंवा चार नगरसेवकांचा असेल. त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आहे. या दोन निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर मनपा निवडणुकीवर शिक्कामोर्तब होणार आहे.
कोल्हापूर मनपा निवडणुकीच्या प्रतीक्षेत
कोल्हापूर मनपाची मुदत 15 नोव्हेंबर 2020 रोजी संपली आहे. तेव्हापासून आजपर्यंत कोल्हापूर मनपा निवडणुकीच्या प्रतीक्षेत आहे. आणि निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार डिसेंबर 2020 मध्ये निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यावेळी एक सदस्य प्रभाग रचना आणि 81 नगरसेवक संख्या यानुसार प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. प्रभाग रचना, आरक्षण सोडत तसेच मतदारयादी काम पूर्ण झाले होते. मात्र, मार्च 2021 मध्ये कोरोनामुळे निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारने सप्टेंबर 2021 मध्ये बहुसदस्य प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार प्रभाग रचना करण्याची आदेश महापालिकेला दिले. 7 ऑक्टोबर 2021 रोजी कोल्हापूर शहरातील 81 प्रभागासाठी प्रत्येकी तीन नगरसेवकांचा एक असे 27 प्रभाग निश्चित करण्यात आले. प्रभाग रचना जाहीर करून आरक्षण सोडते काढण्यात आली. परंतु, पुन्हा निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती.
पावसाळ्यानंतर निवडणूक होण्याची शक्यता
दरम्यान, चार सदस्यांचा एक प्रभाग झाल्यास चार सदस्य 20 प्रभाग तर एक सदस्य असलेला एक प्रभाग होऊ शकतो त्यासाठी किमान तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागू शकतो. कारण यासाठी पूर्णतः नव्याने प्रक्रिया राबवावी लागणार आहे. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक कदाचित पावसाळ्यानंतर होण्याची दाट शक्यता आहे. प्रक्रिया पूर्ण केली तरी सरकारवर असलेल्या टांगत्या तलवारीमुळे निवडणुका घेतल्या जातील की नाही? याबाबत साशंकता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या