Baba Siddiqui Murder Case : मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील (Baba Siddiqui Murder Case) नवीन अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील शूटर शिवकुमारला आज अटक करण्यात आली आहे.
Baba Siddiqui Murder Case : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील (Baba Siddiqui Murder Case) नवीन अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील शूटर शिवकुमारला आज (10 नोव्हेंबर 2024) एसटीएफ उत्तर प्रदेश आणि मुंबई गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली आहे. आरोपी शिवकुमार नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. एसटीएफ टीमचे नेतृत्व प्रमेश कुमार शुक्ला आणि जावेद आलम सिद्दीकी करत होते. अनुराग कश्यप, ज्ञानप्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव आणि अखिलेशेंद्र प्रताप सिंग यांनाही शिवकुमारला आश्रय देणे आणि नेपाळला पळून जाण्यास मदत केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
शिवकुमार हा बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य शूटर आहे. तो थेट लॉरेन्स गँग सिंडिकेटच्या संपर्कात होता. लॉरेन्स गँगच्या सर्व सूचना त्याच्या मोबाईलवर येत होत्या. बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर मध्य प्रदेशातील ओंकारेश्वरला जाणार होते. तिथे त्याला लॉरेन्स गँगच्या एका गुंडाला भेटायचे होते. हत्येनंतर मुंबई पोलीस तत्काळ शिवकुमारच्या शोधात ओंकारेश्वर येथे आले, मात्र तो तेथे सापडला नाही. बाबा सिद्धी हत्येप्रकरणी आतापर्यंत 19 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील तीन मुख्य शूटर धर्मराज, गुरमेल आणि शिवकुमार गौतम यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.
शूटर शिवकुमारने यूपी पोलिसांच्या चौकशीदरम्यान केला मोठा खुलासा
बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला मुख्य शूटर शिवकुमारने यूपी पोलिसांच्या चौकशीदरम्यान मोठा खुलासा केला आहे. शिवकुमारने चौकशीदरम्यान सांगितले की, तो लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित आहे. चौकशीदरम्यान खुलासा केला की, हे हत्याकांड परदेशात बसलेल्या अनमोल बिश्नोईच्या सूचनेवरून घडवून आणले होते. शिवकुमारने चौकशीदरम्यान सांगितले की, शुभम लोणकरने त्याला अनमोल बिश्नोईशी बोलायला लावले होते. अटक करण्यात आलेल्या शिवकुमारने चौकशीदरम्यान सांगितले की, तो आणि धर्मराज कश्यप एकाच गावचे रहिवासी आहेत. मी पुण्यात भंगाराचे काम करायचो. माझे आणि शुभम लोणकर यांचे भंगाराचे दुकान शेजारीच होते. शुभम लोणकर लॉरेन्स विश्नोईसाठी काम करतो. त्याने मला स्नॅप चॅटद्वारे लॉरेन्स विश्नोईचा भाऊ अनमोल विश्नोई यांच्याशी अनेकदा बोलायला लावले आहे. बाबा सिद्दिकीच्या हत्येच्या बदल्यात मला सांगण्यात आले की, हत्येनंतर तुम्हाला दहा लाख रुपये मिळतील आणि तुम्हाला दर महिन्याला काही ना काही मिळत राहील. शुभम लोणकर आणि मोहम्मद यासीन अक्तर या दोघांनी आम्हाला हत्यारे आणि काडतुसे, सिम आणि मोबाईल फोन दिला होता.हत्येनंतर तिन्ही शूटर्सना एकमेकांशी बोलण्यासाठी नवीन सिम आणि मोबाईल देण्यात आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही मुंबईत बाबा सिद्दिकीची रेस करत होतो आणि 12-10-2024 रोजी रात्री योग्य वेळ मिळताच आम्ही बाबा सिद्दिकीची हत्या केली. त्यादिवशी सण असल्याने तिथे पोलिस आणि गर्दी होती, त्यामुळे दोन जण जागीच पकडले गेले आणि मी पळून गेल्याची माहिती आरोपीनं दिली आहे. मी वाटेत फोन फेकून दिला आणि मुंबईहून पुण्याला निघालो. पुण्याहून झाशी आणि लखनौमार्गे बहराईचला पोहोचलो. मधेच हँडलर्सना कोणाचाही फोन विचारून मी माझ्या सहकाऱ्यांशी बोलत राहिलो. ट्रेनमधील एका प्रवाशाकडून फोन विचारून मी अनुरा कश्यपशी बोललो, तेव्हा तो म्हणाला की अबविंद्र, ज्ञानप्रकाश आणि आकाश यांनी मिळून नेपाळमध्ये तुझी लपण्याची व्यवस्था केली आहे. म्हणूनच मी बहराइचला आलो आणि माझ्या मित्रांसह नेपाळला पळून जाण्याचा विचार करत होती अशी माहिती आरोपीनं दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर 2024 ला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सिद्दीकींच्या हत्येमुळं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटक देखील केली होती. अशातच फरार असलेला आरोपी शिवकुमार देखील आज पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे विरोधकांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या आणि सुरक्षेच्या मुद्द्यावरून सरकारला घेरलं आहे. बाबा सिद्दीका यांच्या हत्येवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांवर चांगलीच टीका करताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या: