विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
आष्टी विधान सभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत होणार आहे.. राज्या मध्ये ज्या मैत्रीपूर्ण लढती होत आहेत त्यात महायुती मधील मैत्रीपूर्ण लढतही आष्टी विधानसभा मतदार संघात होत आहे.
बीड : जिल्ह्यातील 6 मतदारसंघाच चुरशीच्या लढती होत असून महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना आहे. मात्र, आष्टी (Ashti) मतदारसंघात महायुतीचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. येथे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी मेहबूब शेख यांना देण्यात आली आहे. तर, महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून सुरेस धस (Suresh Dhas) यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांनीही शड्डू ठोकल्याने मतदारसंघात चौरंगी लढत होत आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघात कोण विजयी होणार, याची चर्चा जिल्ह्यासह राज्यात आहे. त्यातच, मनोज जरांगेंनी घेतलेल्या भूमिकेचा नेमका फायदा कोणाला होणार, आष्टीकर कोणाला पाडणार हेही लवकरच स्पष्ट होईल.
आष्टी विधान सभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत होणार आहे.. राज्या मध्ये ज्या मैत्रीपूर्ण लढती होत आहेत त्यात महायुती मधील मैत्रीपूर्ण लढतही आष्टी विधानसभा मतदार संघात होत आहे. आष्टी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीकडून सुरेश धस हे मैदानात आहेत. तर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाळासाहेब आजबे हे निवडणूक लढवत आहेत. गतवेळेस बाळासाहेब आजबे यांनी येथील मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र, महायुतीकडून त्यांना जागा देण्यात आली नाही. त्यामुळे, याठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहे. तर, भाजपमधूनच बाहेर पडलेले भीमराव धोंडे अपक्ष निवडणूक लढवत आहेत आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मेहबूब शेख हे उमेदवार म्हणून प्रथमच विधानसभा लढवत आहेत. या चौघामुळे आष्टी विधानसभेची ही निवडणूक चौरंगी होत आहे.
2019 मध्ये भीमराव धोंडेंचा पराभव
आष्टी विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे हे विद्यमान आमदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी 25 हजार 825 मतांनी विजय मिळवला होता. आष्टीमधून त्यांनी भाजपच्या भीमराव धोंडा यांचा पराभव केला होता. सध्या भीमराव धोंडे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला असून ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, भाजप महायुतीकडून सुरेश धस यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघात चौरंगी लढत होत आहे.
लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंना लीड
लोकसभा निवडणुकीत यंदा बीड जिल्ह्यातील सर्वच 6 मतदारसंघात चुरस पाहायला मिळाली. त्यात, भाजप नेत्या पंकजा मुंडेंना आष्टी मतदारसंघातून 32 हजारांचे मताधिक्य आहे. त्यामुळे, विधानसभा निवडणुकीत येथील मतदार कोणाच्या बाजुने उभा राहता हे पाहावे लागेल. आष्टी मतदारसंघात यंदा विधानसभेच्या निवडणुकीत भाजप महायुतीने सुरेश धस यांना उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे 6,550 मतांनी विजयी झाले. लोकसभा निवडणुकीच्या निकालात मतदारांनी दिलेला कौल पाहता विधानसभा निवडणूक देखील चुरशीची होत आहे. बीड जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट याही निवडणुकीत दिसून येईल.
हेही वाचा
दीड एकरात शिवरायांचं भव्य मंदिर, शिवमूर्तीचं अयोध्या कनेक्शन; महाराष्ट्रात उभारतंय पहिलं देऊळ