Dhananjay Mahadik on Satej Patil : बंटी पाटलांनी शब्द फिरवला, किंमत मोजावी लागेल; आमदार विनय कोरेंचा 'तो' खुलासा अन् धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
Kolhapur : बंटी पाटलांनी नैतिकता गमावल्याचे सावकरांच्या आरोपातून सिद्ध झालं आहे. त्यामुळे त्यांना इथून पुढे राजकारण, समाजकारण करताना अडचणी येणार असल्याची टीका खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे.
Dhananjay Mahadik on Satej Patil : राजाराम साखर कारखाना निवडणुकीत सतेज पाटील (Satej Patil) आणि महाडिक गटातील वाद टोकाला गेला असतानाच आता जनसुराज्य पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांनी केलेल्या गौप्यस्फोटाने पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगली आहे. त्यामुळे समझोता एक्स्प्रेसमधील कोणी कोणाचा शब्द मोडला? याची चर्चा आता जिल्ह्याच्या राजकारणात रंगली आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी विधानपरिषद निवडणुकीत दिलेला शब्द पाळला नाही, असे वक्तव्य आमदार विनय कोरे यांनी सत्ताधारी महाडिक गटाच्या कुंभोजमधील सभेत केलं आहे. विधानपरिषद बिनविरोध केल्यानंतर राजाराम कारखाना बिनविरोध करण्याचं ठरलं होतं असं विनय कोरे आणि धनंजय महाडिक यांनी म्हटलं आहे. मात्र, कारखान्याची निवडणूक लावून सतेज पाटील यांनी दिलेला शब्द फिरवल्याचा आरोप केला आहे.
विनय कोरेंच्या गौप्यस्फोटावर धनंजय महाडिक काय म्हणाले?
विनय कोरे यांनी केलेल्या विधानानंतर खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी पुन्हा सतेज पाटील यांच्यावर तोफ डागली आहे. ते म्हणाले की, विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची जागा बंटी पाटलांना देऊन बिनविरोध करायची आणि बदल्यात राजाराम कारखान्याची निवडणूक लढवायची नाही. बिनविरोध करायची असा शब्द दिला होता, असं कोरे यांनी सांगितले. तो समझोता झाला होता. तो शब्द सतेज पाटील यांनी मोडल्याचे विनय कोरे यांनी म्हटले आहे. संजय पाटील, बंटी पाटील, चंद्रकांत पाटील तसेच विनय कोरे यांच्यासोबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाली होती. त्या बैठकीत हा निर्णय झाला होता. आता या विषयावर आता बोलण्यात अर्थ नाही. बंटी पाटील हे द्वेषातून राजकारण करतात. त्यातील आर्थिक बाबींचा वापर स्वत:च्या राजकारणासाठी करतात.
बंटी पाटलांनी नैतिकता गमावली
धनंजय महाडिक पुढे म्हणाले की, गेली अनेक वर्ष आम्ही सांगत होतो. लोकांना वाटायचं हा महाडिक विरुद्ध पाटील सामना आहे, पण सावकारांच्या (विनय कोरे) वक्तव्याने आता सिद्ध झालेलं आहे. कोल्हापूर जिल्हा हा विचाराने चालणारा जिल्हा आहे. कोल्हापूरचे लोक विचाराच्या आणि नैतिकतेच्या पाठिशी उभा राहिले आहेत. बंटी पाटलांनी नैतिकता गमावल्याचे सावकरांच्या आरोपातून सिद्ध झालं आहे. त्यामुळे त्यांना इथून पुढे राजकारण, समाजकारण करताना अडचणी येणार आहेत. एन. डी. पाटलांनी त्यांना सुर्याजी पिसाळची उपमा टोलच्या आंदोलनावेळी दिली होती. ते सुडबुद्धीने काम करतात हे जिल्ह्याला माहीत झालं आहे. त्यांच्या पाठिशी जिल्हा थांबणार नाही. त्यांना किंमत मोजावी लागेल.
काय म्हणाले होते विनय कोरे?
विनय कोरे म्हणाले की, विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मी पुढाकार घेतला होता. त्यावेळी माझ्या घरात मी चंद्रकांत पाटील, उद्योगपती संजय पाटील आणि बंटी पाटील यांची बैठक झाली होती. त्या बैठकीत संजय पाटील आणि बंटी पाटील यांनी ही निवडणूक बिनविरोध झाल्यास आम्ही राजाराम कारखाना बिनविरोध करू असा शब्द मला दिला होता, पण दुर्दैवाने बंटी पाटलांची शब्द फिरवण्याची वृत्ती समोर आली. त्यांनी विश्वासघात करून राजाराम कारखान्याची निवडणूक सभासदांवर लादली आहे. विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मी पुढाकार घेतला होता. त्यानुसार मी माजी आमदार महादेवराव महाडिक आणि अमल महाडिक यांना विनंती केली. माझ्या विनंतीला मान देत विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध केली. आमदार झाले, नंतर मंत्री झाले आणि नैतिकता विसरले. दुर्दैवाने बंटी पाटलांनी शब्द फिरवला पण मी महाडिकांना दिलेला शब्द पाळणार आहे. त्यामुळे व्यासपीठावर असल्याचे कोरे यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या