Kolhapur News : देवदर्शनासाठी बहिण, भाच्याला घेऊन निघाले अन् वाटेत काळाचा घाला; कोल्हापूर पोलिस दलातील कर्मचाऱ्यासह तिघांचा दुर्दैवी अंत
नितीन पवार यांच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूने कोल्हापूर पोलिसांसह जुना राजवाडा पोलिस ठाण्यामध्ये सन्नाटा पसरला. नुकत्याच झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा नितीन यांनी हाताळली होती.
कराड (जि. सातारा) : पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कारने उभ्या असलेल्या मालट्रकला मागून धडक दिल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कराडनजीक घडली. या अपघातात मृत्यूमुखी पडलेले तिघेची रक्ताच्या नात्यातील आहेत. यामध्ये कोल्हापूर पोलिस दलातील (Kolhapur Police) जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील कर्मचारी नितीन बापूसाहेब पोवार (वय 34 रा. कोल्हापूर ) त्यांची बहिण मनीषा आप्पासाहेब जाधव (वय 42) व अभिषेक आप्पासाहेब जाधव (वय 26 दोघेही रा. मु. पो. जरळी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) यांचा समावेश आहे. धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर होऊन मृतदेह छिन्नविच्छिन्न झाले होते.
कोल्हापुरातून पुण्याकडे जाताना काळाचा घाला
नितीन पोवार कार (एमएच-01-एएल-5458) मधून बहिण मनीषा आणि भाचा अभिषेकसह कोल्हापूरकडून पुण्याकडे जात होते. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील पाचवड फाटा इथं भाग्यलक्ष्मी हॉटेलजवळ आले असताना कडेला उभ्या असलेल्या आयशर ट्रकला भरधाव वेगात पाठीमागून जोरदार धडक झाली. धडक एवढी जोरात होती की कारट्रकच्या चाकापर्यंत घुसली. या अपघातात कारमधील तिघांचाही जागीच मृत्यू झाला. देखभालच्या कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी अपघाताची माहिती महामार्ग पोलिसांसह कराड शहर व तालुका पोलिसांना दिली.कारमधील तिघांचेही मृतदेह छिन्न-विछिन्न अवस्थेत कारमध्येच अडकून पडले होते. क्रेनच्या मदतीने चक्काचूर झालेल्या कारमधून दीड तासांच्या प्रयत्नानंतर तिघांचे मृतदेद बाहेर काढण्यात यश आले.
कोल्हापूर पोलिसात सन्नाटा पसरला
दरम्यान, नितीन पवार यांच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूने कोल्हापूर पोलिसांसह जुना राजवाडा पोलिस ठाण्यामध्ये सन्नाटा पसरला. नुकत्याच झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा नितीन यांनी हाताळली होती. दोन दिवसांपूर्वी रजा मंजूर झाल्यानंतर त्यांनी देवदर्शनाला जाण्यासाठी बेत केला होता. देवदर्शनाला जात असताना थेट त्यांच्या मृत्यूचीच बातमी आल्याने सर्वांनाच मानसिक धक्का बसला. त्यांच्या पक्षात आई-वडील, भाऊ, वहिनी, पत्नी आणि लहान मुलगी असा परिवार आहे.
माय-लेकाच्या मृत्यूने गडहिंग्लज सुन्न
अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या मनीषा जाधव व त्यांचा मुलगा अभिजित यांचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच गडहिंग्लज तालुक्यातील जरळीत सन्नाटा पसरला. भाऊ नितीन पवार यांनी देवदर्शनासाठी जायचे असल्याचे बहीण मनीषाला सांगितले होते. पत्नी मनीषासोबत पती आप्पासाहेब जाणार होते, पण अभिजितने मी जातो असे सांगून अभिजित मोटारसायकलने हणबरवाडीला गेला होता. त्याठिकाणी मोटारसायकल लावून तिघेही पवार यांच्या कारमधून देवदर्शनासाठी निघाले. मात्र, मध्येच त्यांच्यावर काळाने घाला घातला.
इतर महत्वाच्या बातम्या