Pune Bengaluru Accident : भरधाव चारचाकीची ट्रकला मागून धडक, बहीण-भावासह तिघांचा मृत्यू, कराडजवळ भीषण अपघात
पुणे-बंगळुरू (Pune Bangalore highway accident) महामार्गवरील कराडजवळ (Karad accident) भीषण अपघात झाला. चार चाकी वाहनाने ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.
सातारा : पुणे-बंगळुरू (Pune Bangalore highway accident) महामार्गवरील कराडजवळ (Karad accident) भीषण अपघात झाला. चार चाकी वाहनाने ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये बहीण भावाचा समावेश आहे.कराड तालुक्यातील पाचवड फाटा (Pachwad Phata) येथे हा अपघात झाला.
या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली. चारचाकी गाडी वेगात आली होती. मात्र पुढे असलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने मागूनच गाडीने ट्रकला धडक दिली. त्यामुळे ही भीषण दुर्घटना घडली.
दरम्यान, या अपघातात अभिषेक जाधव,भारती जाधव आणि नितीन पोवार यांचा मृत्यू झाला आहे. अभिषेक आणि भारती जाधव हे दोघे भाऊ-बहीण होते. अभिषेक जाधव हा कोल्हापूर पोलिसात कार्यरत आहे. हे सर्वजण मुंबईला निघाले असताना हा भीषण अपघात झाला.
नेमकं काय घडलं?
अभिषेक जाधव,भारती जाधव आणि नितीन पोवार हे चारचाकी गाडीने मुंबईच्या दिशेने निघाले होते. त्याचवेळी त्यांची गाडी कराडजवळ पाचवड फाटा परिसरात आली. या चारचाकीचा वेग जास्त होता. त्याचवेळी समोर असलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने आणि गाडीवर नियंत्रण न राहिल्याने ही गाडी जाऊन थेट ट्रकवर धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, चार चाकी वाहनाचा अक्षरश: चक्काचूर झाला. या भीषण धडकेत चार चाकी गाडीतील तिघांचा मृत्यू झाला.
अभिषेक जाधव कोल्हापूर पोलिसात कार्यरत
दरम्यान, अपघातात मृत्यूमुखी पडलेले अभिषेक जाधव हे पोलीस दलात कार्यरत आहेत. सध्या ते कोल्हापूर पोलिसात सेवा बजावत आहेत. बहिणीसोबत ते मुंबईला निघाले होते. त्याचवेळी बहीण भावावर काळाने घाला घातला. या दुर्दैवी अपघाताने जाधव कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसंच सहकारी गेल्याने कोल्हापूर पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळी नवले पुलावरही अपघात
दरम्यान, याच मार्गावर आज सकाळी पुण्यातील नवले पुलाजवळही दुसरा एक अपघात झाला होता. मालवाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याने नवले पुलाची वाहतूक विस्कळीत झाली होती. या ट्रकखाली दुचाकीस्वार आला होता. त्यामुळे त्याला दुखापत झाली होती. याशिवाय या अपघातामुळे वाहतूकही विस्कळीत झाली होती.