Kolhapur News : राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री दीपक केसरकरांकडून कोल्हापूर जिल्ह्यासाठी 302 कोटी वाढीव निधीची मागणी
जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण प्रारुप आराखडा सन 2023-24 राज्यस्तरीय बैठक उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ काॅन्फरन्सच्या माध्यमातून पार पडली.
Kolhapur News : जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण प्रारुप आराखडा सन 2023-24 राज्यस्तरीय बैठक उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ काॅन्फरन्सच्या माध्यमातून पार पडली. या बैठकीत कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधाण सन 2023-24 साठी 389 कोटी 36 लाखाचा आराखडा सादर केला. परंतु, यामध्ये विविध महत्त्वपूर्ण क्षेत्रासाठी 302 कोटी वाढीव निधीची मागणी त्यांनी वित्त व नियोजन मंत्री यांच्याकडे केली.
वाढीव मागणीमध्ये सामान्य शिक्षणासाठी 40 कोटी, व्यवसाय तंत्र उच्च शिक्षणासाठी 12 कोटी 50 लाख, पर्यटनासाठी 29 कोटी, आरोग्य सेवेसाठी 64 कोटी 33 लाख, नगर विकास साठी 56 कोटी, रस्ते विकासासाठी 20 कोटी, ग्राम विकाससाठी 17 कोटी तर जिल्ह्यातील कुस्तीची परंपरा जपण्यासाठी जुन्या व ऐतिहासिक तालमीचे संवर्धन व सक्षमीकरण करता 8 कोटी 50 लाखाच्या विशेष निधीची मागणी पालकमंत्री केसरकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या राज्यस्तरीय बैठकीत वित्त व नियोजन मंत्री फडणवीस यांच्याकडे केली.
पालकमंत्री केसरकर पुढे म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यात 12 तालुके असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा जिल्हा आहे. तसेच कोल्हापूर महानगरपालिकेसह नव्याने निर्माण करण्यात आलेली इचलकरंजी महानगरपालिके बरोबरच 13 नगरपंचायत/ नगरपरिषदा आहेत. अति पर्जन्यमान, महापुराची वारंवारता व सन 2016-17 पासून मिळणाऱ्या अपुऱ्या निधीचा विचार करता कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण मध्ये 302 कोटीची वाढ मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली.
यावेळी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनीही कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा नियोजन समितीला अतिरिक्त निधी देण्याची मागणी केली. आमदार प्रकाश आवाडे यांनीही नव्याने निर्माण झालेल्या इचलकरंजी महानगरपालिका विकासासाठीही जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून भरीव तरतूद करावी. यासाठी राज्य स्तरावरून अधिकचा निधी देण्याची मागणी केली.
बैठकीसाठी पालकमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी राहुल रेखावार, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील यांच्यासह अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या