Sharad Pawar: सामान्यांचे दु:ख दूर करण्यासाठी संपतराव पवार पाटील यांनी आपली शक्ती पणाला लावली : शरद पवार
Sampatrao Pawar Patil : गोरगरीब, वंचित, शोषितांसाठी आयुष्य वेचलेले चळवळीतील उत्तुंग व्यक्तीमत्व शेकापचे माजी आमदार संपतराव पवार पाटील यांचा अमृतमहोत्सवी सत्कार थाटात करण्यात आला.
Kolhapur News : गोरगरीब, वंचित, शोषितांसाठी आयुष्य वेचलेले चळवळीतील उत्तुंग व्यक्तीमत्व शेकापचे माजी आमदार संपतराव पवार पाटील यांचा अमृतमहोत्सवी सत्कार थाटात करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते संपतबापू यांचा सर्वपक्षीय सत्कार करण्यात आला.
शरद पवार म्हणाले की, सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सेाडवणूक करण्यासाठी संघर्ष करण्याची भूमिका घेऊन संपतराव पवार यांनी आयुष्यभर काम केले. सामान्यांचे दु:ख दूर करण्यासाठी आपली शक्ती त्यांनी पणाला लावली. हद्दवाढ, पाणी प्रश्न तसेच नव्या शिक्षण धोरणाला आवर घालण्याच्या प्रश्नावर लढले. आमदार असताना दहा वर्षांत त्यांनी स्वत:चा विचार कधी केला नाही. अतिशय निर्मळपणे काम करत राहिले, . सहकारामध्ये काम करूनही चारित्र्यावर डाग पडू न देणार्या संपतराव पवार यांनी सत्तेपेक्षा नेहमी शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी समाजातील शेवटच्या घटकाचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिक महत्त्व दिले. सामान्यांचे अश्रू पुसण्याचे काम त्यांनी केले.
कोल्हापूर येथे शेतकारी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार संपतराव पाटील पवार यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमास उपस्थितीत राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थितांशी संवाद साधला.https://t.co/dlIMkVYhre
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 28, 2023
ज्यांच्यामुळे आपण आमदार झालो त्यांच्यासाठी आपणही काही तरी केले पाहिजे, ही त्यांची तळमळ आजही अस्वस्थ करणारी आहे. त्यांची ही अस्वस्थता दूर करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे, असेही शरद पवार म्हणाले. ते पुढे म्हणाले की, शाहूरायांचा समतेचा विचार पुढे नेण्याऐवजी जाती-धर्माच्या नावाखाली वेगळा विचार मांडून तो वाढविला जात आहे. माणसा माणसांमधील अंतर वाढवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही शक्ती करत आहेत. पुरोगामी म्हणून ओळखण्यात येणार्या महाराष्ट्रातीलच नव्हे, तर संपूर्ण देशातील हे चित्र दिसत आहे. या शक्तीला रोखण्याचे काम या पुढील काळात सर्वांनी मिळून करण्याची आवश्यकता आहे.
दरम्यान, माजी आमदार सत्कारमूर्ती संपतराव पवार-पाटील म्हणाले की, सांगरूळ विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या ऋणांतून मी कधीही मुक्त होऊ शकत नाही. लोकांनी मला भरपूर दिले; परंतु मी मात्र त्यांना काही देऊ शकलो नाही, ही गोष्ट आजही मला अस्वस्थ करणारी आहे.
इतर महत्वाच्या बातम्या