Kolhapur News : कोल्हापूरचे माजी महापौर बाबू फरास यांचे निधन, मुस्लिम समाजातील पहिले महापौर
कोल्हापूरचे माजी महापौर तसेच मुस्लिम समाजातील पहिले महापौर बाबू हारून फरास (वय 70) यांचे रविवारी निधन झाले. शिंगणापूर थेट पाईपलाईन योजना त्यांच्याच कार्यकाळात मंजूर करण्यात आली होती.
Kolhapur News : कोल्हापूरचे माजी महापौर तसेच मुस्लिम समाजातील पहिले महापौर बाबू हारून फरास (वय 70) यांचे रविवारी निधन झाले. शिंगणापूर थेट पाईपलाईन योजना त्यांच्याच कार्यकाळात मंजूर करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून फरास यांचा प्रकृतीशी संघर्ष सुरु होता. दोन दिवसांपूर्वी त्यांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्यांचे काल रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी माजी महापौर हसीना फरास, दोन मुले माजी नगरसेवक आदिल व वासीम फरास, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ते मुस्लिम बोर्डिंगचे माजी संचालक तसेच नेहरू हायस्कूलचे चेअरमनही होते.
बाबू फरास तीन नगरसेवक म्हणून निवडून आले
बाबू फरास हे कोल्हापूर महापालिकेवर तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांचे वडील हारून फरास शेतकरी कामगार पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यामुळे बाबू फरास यांचीही राजकीय जीवनाची सुरुवात शेकाप, डाव्या चळवळीतून झाली. बाबू फरास 1978 ते 1984, त्यानंतर 85 ते 90 आणि 95 ते 2000 या कालावधीत नगरसेवक झाले.
तीनवेळा नगरसेवक भुषवताना त्यांनी पक्ष प्रतोद, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता, शिक्षण समिती सदस्यपदही भूषविले. शिक्षण मंडळात दोन दशकांहून अधिक काळ काम केले. विरोधी गटात असताना 1999 मध्ये झालेली महापौरपदाची निवडणूक गाजली होती.आघाडीकडे 18 नगरसेवक असताना निवडणूक जिंकली. त्यावेळी शिवसेनेच्या 11 सदस्यांनी तसेच भाजपच्या दोन सदस्यांनीही त्यांच्या बाजूने मतदान केले. यामुळे फरास यांना 38, तर सत्ताधारी ताराराणी आघाडीचे उमेदवार नंदकुमार वळंजू यांना 33 मते मिळाली. ते 17 नोव्हेंबर 99 ते 17 नोव्हेंबर 2000 पर्यंत महापौर होते.
मुस्लिम समाजातील पहिले महापौर
फरास यांना महापौर करण्यात शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरली. सुरेश साळोखे यांच्या माध्यमातून त्यांनी बाळासाहेब ठाकरेंशी संपर्क करून शिवसेनेच्या मदतीने महापौरपद मिळवले होते. शिवसेनाप्रमुखांच्या भूमिकेमुळे फरास महापौर झाले होते. त्यानंतर त्यांनी ‘मातोश्री’वर शिवसेनाप्रमुखांची भेट घेतली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या