Ajit Pawar on Satej Patil: अजितदादा म्हणाले, आता सतेज पाटलांना बंटी, बंटी, बंटी म्हणू नका, कारण आता बंटींना...!
सतेज पाटील कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात बंटी पाटील या टोपणनावानेच प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांचे सतेज हे मूळ नाव कमी आणि बंटी हे टोपणनाव सर्वाधिक चर्चेत असते
Ajit Pawar on Satej Patil: विरोधी पक्षनेते अजित पवार आणि माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील कोल्हापुरात (Kolhapur News) एकाच व्यासपीठावर येण्याचा योग आला. यावेळी पुन्हा एकदा अजित पवारांच्या बिनधास्त स्वभावाची प्रचिती आली. सतेज पाटील कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात बंटी पाटील या टोपणनावानेच प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांचे सतेज हे मुळ नाव कमी आणि बंटी हे टोपण नाव सर्वाधिक चर्चेत असते. हाच धागा पकडून अजित पवार यांनी भाष्य केले.
आता सतेज पाटलांना बंटी, बंटी, बंटी म्हणू नका...
कोल्हापुरातील राधानगरी रोडवरील नवीन वाशी नाका येथे गोकुळचे संचालक अरुण डोंगळे व त्यांचे सुपुत्र अभिषेक डोंगळे यांच्या हॉटेल चिरंजीवीचे उद्घाटन अजितदादांच्या हस्ते करण्यात आले. आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याला आमदार सतेज पाटीलही उपस्थित होते. हॉटेल चिरंजीवीचे उद्घाटनानंतर अजितदादा यांनी सतेज पाटलांच्या बंटी नावावरून फिरकी घेतली. ते म्हणाले की, सतेज पाटील यांना बंटी, बंटी, बंटी म्हणू नका कारण आता बंटी पाटील यांना बंटी झालेत. यावेळी त्यांनी आमदार ऋतुराज पाटील यांच्या नावाचाही उल्लेख केला.
सतेज पाटील यांचं वय 50 वर्ष झालं तरी त्यांना राज्यमंत्रीच ठेवलं
अजितदादांनी यापूर्वी सप्टेंबर 2021 मध्येही सतेज पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपदी संधी न दिल्याने काँग्रेस नेतृत्वाला कोपरखळी मारली होती. त्यावेळी सुद्धा चांगलीच चर्चा रंगली होती. पिंपरी-चिंचवडमध्ये बोलताना अजित पवार यांनी काँग्रेस नेते आणि सतेज पाटील यांच्यावर टोलेबाजी करताना सतेज पाटील यांचं वय 50 वर्ष झालं तरी त्यांना राज्यमंत्रीच ठेवलं आहे. किती दिवस काँग्रेस त्यांना राज्यमंत्री ठेवणार? अशी विचारणा केली होती. पिंपरी चिंचवडमधील आकुर्डीत डी. वाय. पाटील ज्ञानशांती शाळेचं उद्घाटन अजितदादांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर त्याच कार्यक्रमात सतेज पाटील यांच्यावर टोलेबाजी केली होती. नव्या पिढीला पुढे आणण्यासाठी शरद पवार यांनी 40 पूर्ण नसतानाही आम्हाला मंत्रिपद दिलं. त्या माध्यमातून आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला. राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांच्या अधिकारात फरक असतो. राज्यमंत्र्यांनी मनात आणलं, तरी कॅबिनेट मंत्र्याने सहकार्य केल्याशिवाय ते काम राबवण्यात अडचणी येत असतात, असेही अजित पवार म्हणाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या