Solapur Samarth Bank: सोलापूरच्या समर्थ बँकेवर RBI ची मोठी कारवाई, लोकांनी बँकेला घेरलं, पैसे काढण्यासाठी रांग
आम्हाला आमचे पैसे द्या अन्यथा बँकेत तोडफोड करू, बँक कर्मचाऱ्यांना आम्ही बाहेरही जाऊ देणार नाही अशा आक्रमक प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.

Solapur Samarth Bank: सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेवर आरबीआयने निर्बंध आणल्याच्या बातमीनंतर आज सकाळपासून बँकेसमोर मोठी गर्दी जमली आहे. ठेवीदारांना आपली ठेव काढून घ्यायची असल्याने बँकेसमोर घाईगडबड आणि तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. ऐन दिवाळीच्या तोंडावर बँकेत पैसे अडकल्याने ठेवीदारांचा मोर मोठा प्रश्न उभा राहिलाय. ( RBI restrictions on Solapur Samarth Bank)
रिझर्व बँक ऑफ इंडियाने सोलापूरच्या समर्थ बँकेवर निर्बंध घातल्याने बँकेतील कोणतीही ठेव काढता येणार नाही असे उत्तर बँक कर्मचाऱ्यांकडून दिले जात आहे. त्यामुळे बँक कर्मचारी आणि ठेवेदार यांचातवाद सुरू आहेत. आम्हाला आमचे पैसे द्या अन्यथा बँकेत तोडफोड करू, बँक कर्मचाऱ्यांना आम्ही बाहेरही जाऊ देणार नाही अशा आक्रमक प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.
ठेवीदार बँक कर्मचाऱ्यांमध्ये तणाव वाढला
ठेवीदार आणि बँक कर्मचाऱ्यांमध्ये तणाव वाढला असून बँकेचे कर्मचारी ठेवीदारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ठेवीदारांच्या शंका दूर होताना दिसत नाहीत. बँकेकडून सध्या कोणत्याही अकाउंट मधून ठेवी काढता येणार नाहीत असे ठेवीदारांना सांगितले जात आहे. आधीच अतिवृष्टीमुळे शेती वाहून गेलीये. मागच्या हंगामातील उसाचे पैसे आत्ता बँकेत आले होते. तेच पैसे आता बँकेत अडकलेत. दिवाळीच्या तोंडावर घर चालवण्यासाठी ही पैसे शिल्लक नाहीत. आता करायचं काय? अशी प्रतिक्रिया शेतकरी ठेवीदाराने दिली. अनेक ठेवीदारांना रुग्णालयाचे बिल, औषधे खरेदी तसेच अनेक वैयक्तिक कामांसाठी पैसे हवे आहेत. मात्र आरबीआय ने घातलेल्या निर्बंधांमुळे ठेवीदारही हतबल झाले आहेत. बँकेचे अधिकार्यांचे आणि RBI कडील पुढील विधान आल्यापर्यंत ठेवीदारांनी संयम राखावा, असे बँक कर्मचाऱ्यांचे आवाहन आहे.
RBI restrictions on samartha sahakari Bank:नेमकं प्रकरण काय ?
सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेवर आरबीआयने पुढील सहा महिन्यांसाठी निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांमुळे आरबीआयच्या पूर्वपरवानगीशिवाय बँक कोणतंही नवीन कर्ज देऊ शकणार नाही, ठेवीस विचारू शकणार नाही किंवा कोणतेही मालमत्ता विक्री किंवा हस्तांतर करू शकणार नाहीये. बँकेची सध्याची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन ठेवीदारांना त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यास देखील आरबीआयकडून मनाई करण्यात आली आहे. मात्र ठेवीदारांना डीआयसीजीसी योजनेअंतर्गत त्यांच्या ठेवीवर पाच लाखांपर्यंत ठेव विमा मिळू शकतो असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे.
बँकेवरील ही बंधने लवकरात लवकर हटतील
दरम्यान, समर्थ बँकेने देखील प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपली बाजू स्पष्ट केलीय. गेल्या तीन महिन्यात बँकेने लक्षणीय प्रगती केली आहे. तसेच सभासदांचे भागभांडवल दुप्पटीने वाढले आहे. बँकेचे संचालक मंडळ आणि अधिकारी यासंदर्भात भारतीय रिझर्व बँकेच्या संपर्कात असून बँकेवरील ही बंधने लवकरात लवकर हटतील, असा विश्वास समर्थ सहकारी बँकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे यांनी व्यक्त केलाय.

























