(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maratha Reservation: आम्ही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला तयार, पण आधी विरोधकांनी जाहीरनाम्यात तसे वचन द्यावे; रावसाहेब दानवे यांचं महत्त्वाचं वक्तव्य
Raosaheb Danve: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली. पश्चिम महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमधून मनोज जरांगे पाटलांची शांतता रॅली जाणार आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता.
जालना: राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापले असताना भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. आम्ही मराठा समाजाला ओबीसी (OBC Reservation) प्रवर्गातून आरक्षण द्यायला तयार आहोत, पण आधी विरोधकांनी त्यांच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात ही बाब मान्य असल्याचे वचन द्यावे, असे रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी म्हटले. ते मंगळवारी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी रावसाहेब दानवे यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन छेडले असता मनोज जरांगे पाटील यांना अपेक्षित असलेले आरक्षण द्यायला आम्ही तयार असल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. आम्हाला कायद्याच्या चौकटीत राहून मराठा समाजाला (Maratha Reservation) जितके आरक्षण देणे शक्य आहे,तितके आरक्षण आम्ही दिले आहे. परंतु, तेवढ्याने मनोज जरांगे पाटील यांचे समाधान झालेले नाही. त्यापेक्षा जास्त आरक्षण हवे असेल तर तो मागण्याचा अधिकार मनोज जरांगे यांना आहे. पण आता (लोकसभा निवडणूक) ज्यांना कोणाला जास्त मतं पडली आणि जे निवडून आले त्यांनी म्हणजे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने फक्त एकच मागणी करावी की, जरांगे पाटील ज्याप्रमाणे म्हणतात ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण द्या, ते आरक्षण द्यायला आम्ही तयार आहोत. तसं वचन विरोधकांनी निवडणुकीच्या जाहीरनाम्यात द्यावे, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले.
मनोज जरांगेंनी 288 जागांवर खुशाल उमेदवार उभे करावेत: रावसाहेब दानवे
मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत 288 विधानसभा मतदारसंघात उमेदवारी उभे करण्याची भाषा केली आहे. याबद्दल रावसाहेब दानवे यांना विचारण्यात आले असता त्यांनी म्हटले की, आम्हाला काहीही वाटत नाही. मनोज जरांगेंनी खुशाल उमेदवार उभे करावेत. त्यांना अधिकार आहे, असं कोण म्हणू शकतो, उमेदवार उभे करु नका. त्यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्यापासून कोणी रोखू शकणार नाही, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
सोलापूरात मराठा समाजाच्या शांतता रॅलीमुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीमुळे सोलापूर शहरातील शाळांना बुधवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार असल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून तसे आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार सोलापूर शहरातील महाविद्यालय, विविध शाळा आणि शैक्षणिक शैक्षणिक संस्थांना सु्ट्टी देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीला 288 ओबीसी उमेदवार उभे करण्याबाबत चाचपणी
पंजाबच्या अमृतसर येथे आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 9 वे राष्ट्रीय अधिवेशन होत आहे.राष्ट्रीय ओबीसी महासंघ महाराष्ट्रात पण 288 मतदार संघाची चाचपणी करत असून राखीव मतदार संघ वगळता सर्व मतदार संघातील ओबीसी उमेदवाराला समर्थन देण्याचा ठराव आजच्या राष्ट्रीय अधिवेशनात घेणार असल्याचे बबनराव तायवाडे यांनी सांगितले.
आणखी वाचा
मनोज जरांगे हा शरद पवारांनी उभा केलेला माणूस, प्रकाश आंबेडकरांचा अकोल्यातून शाब्दिक हल्ला