मोठी बातमी : रावसाहेब दानवेंच्या अडचणी वाढणार, स्वाभिमानी संघटनेचा मविआ उमेदवार डॉ. कल्याण काळेंना पाठिंबा
Jalna Lok Sabha Eelction 2024 : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यपातळीवर या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच राजकीय भूमिका जाहीर केली आहे. जालना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे.
जालना : जालना लोकसभा मतदारसंघातून (Jalna Loksabha Constituency) स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Shetkari Sanghatana) महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) पाठिंबा जाहीर केला आहे. जालन्यात (Jalna Lok Sabha) महाविकास आघाडीचे उमेदवार (MVA Candidate) डॉ. कल्याण काळे (Dr. Kalyan Kale) यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे. राज्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कुणासोबतही आघाडी किंवा युती नाही, मात्र जालना लोकसभेत स्थानिक पातळीवर स्वाभिमानीने मविआला पाठिंबा दिला आहे.
जालन्यात स्वाभिमानीचा महाविकास आघाडीला पाठिंबा
जालना लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर महायुतीकडून रावसाहेब दानवे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याने रावसाहेब दानवे यांच्यासमोर नवं राजकीय आव्हान उभं राहणार आहे, दरम्यान शेतकरी हितासाठीच आपण मविआला पाठींबा देत असल्याचं स्वाभिमानीचे जालना जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी सांगितलं आहे.
स्वाभिमानी संघटना डॉ. कल्याण काळेंच्या पाठिशी
जालन्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना ना महायुतीसोबत आहे, ना महाविकास आघाडीसोबत. राजू शेट्टी यांनी स्वतंत्र भूमिका घेत हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवली. येत्या 13 तारखेला जालना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनाही मतदान करायचं आहे, त्यांनी कुणाला मतदान करावं, आपण काही अटी-शर्ती ठेवल्या आणि त्या अटी-शर्ती ज्या उमेदवाराला मान्य असतील, त्या उमेदवाराला आम्ही जाहीर पाठिंबा देण्याची भूमिका घेतली.
या निवडणुकीत पहिल्यांदाच स्वाभिमानीची राजकीय भूमिका
जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी म्हटलं की, आम्हाला राजू शेट्टींनी आम्हाला मुभा दिली आहे की, तुम्ही स्थानिक पातळीवर योग्य तो निर्णय घ्या, कुणाला पाठिंबा द्यायचा आणि काय करायचं हे स्थानिक पातळीवर ठरवण्यास त्यांनी सांगितलं. त्यानुसार आम्ही कार्यकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये शेतकरी हिताच्या काही मागण्या काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण समोर ठेवल्या आणि ते त्यांनी मान्य केल्या. यामुळे स्वाभिमानी संघटना आता त्यांच्या पाठिशी असेल, असं काळे यांनी म्हटलं आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्या काय आहेत?
शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे, फक्त हमीभाव मिळूनही फायदा नाही, त्या हमीभावाचा गँरेटीही मिळाली पाहिजे, तसा कायदा केंद्रात आला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. शेतकरी आत्महत्या आणि शेतकरी पिकविम्यासाठी मिळणाऱ्या सानुग्रह अनुदानाची रक्कम दोन लाखांऐवजी पाच लाख झाली पाहिजे, अशीही एक मागणी आहे. आरक्षणाच्या मुद्द्याचाही विषय, त्यांनी मान्य केला आहे, अशा अनेक मागण्या काळेंनी मान्य केल्या आहेत.
भाजपचं धोरणं शेतकरी विरोधी
जिल्ह्यात मक्याचं क्षेत्र मोठं असतानाही विद्यमान खासदारांनी मात्र जिल्ह्यात एकही मका प्रक्रिया उद्योग आणला नाही. जालना जिल्हा मोसंबीचा आगाम म्हणून ओळखला जातो, तरीही या जिल्ह्यात एकही मोसंबी प्रक्रिया केंद्र खासदारांनी उघडलेलं नाही. सातत्याने भाजपचं धोरणं शेतकरी विरोधी पाहायला मिळत आहे, त्यामुळे शेतकऱ्याचं मरण होत आहे. यामुळे एक सक्षम पर्याय म्हणून डॉ. कल्याण काळे यांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं घेतल्याचं सुरेश काळे यांनी सांगितलं आहे.