Nagpur : अतिक्रमण पथक येण्यापूर्वीच मिळते 'टीप'; कारवाईनंतर लगेच 'जैसे थे'
फुटपाथवर अतिक्रमणाचा ताबा आहे. नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथच उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. यावर महानगरपालिका आयुक्तांनी बैठक घेऊन अतिक्रमणाविरुद्ध व्यापक मोहीम चालविण्याचे निर्देश दिले.
नागपूरः शहरातील विविध भागात फक्त कागदावर अतिक्रमण कारवाई करण्यात येते. अतिक्रमण पथक येण्यापूर्वीच मनपाच्या अधिकाऱ्यांना नियमित 'भाव' देणाऱ्यांना टीप दिली जाते. कारवाई दरम्यान अतिक्रमणाची दुकाने-ठेले आजूबाजूच्या गल्लीमध्ये उभी करण्यात येतात. पथक येऊन कारवाई करुन गेल्यावर पुन्हा दुकाने थाटली जातात. हे सर्व परिसरातील नागरिकांना दिसत असले तरी अर्थपूर्ण संबंध असलेल्या मनपा आणि वाहतूक विभागातील काही पोलिसांना दिसत नसेल का? असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत.
मात्र नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता मनपाच्यावतीने आजपासून फुटपाथवरील अतिक्रमणावर आजपासून धडक कारवाई करण्यात येणार आहे. या संदर्भात मनपा आयुक्तांनी बैठक घेतली. फूड स्टॉल्स, कपडे, दैनंदिन वस्तू, फळे-भाजी विक्रेत्यांनी फुटपाथवर ताबा मिळवला आहे. शहरात नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथच उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. ही समस्या शहरातील जवळपास प्रत्येक बाजारपेठेची आहे. यावर महानगरपालिका आयुक्तांनी बैठक घेऊन अतिक्रमणाविरुद्ध व्यापक मोहीम चालविण्याचे निर्देश दिले आहेत.
आजपासून ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे. आता अतिक्रमण पथकाने जप्त केलेला माल 30 दिवस मनपाच्या ताब्यात राहणार आहे. मनपाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त (घनकचरा) डॉ. गजेंद्र महल्ले, उद्यान अधिक्षक अमोल चौरपगार, बाजार अधिक्षक श्रीकांत वैद्य, सहायक आयुक्त अशोक पाटील, प्रकाश वराडे यांच्यासह झोनचे सहायक आय़ुक्त उपस्थित होते. बैठकीत फुटपाथवरील अतिक्रमणासंदर्भात शहरातील अनेक वृत्तपत्रांनी वृत्त मालिका प्रकाशित केल्यावर मनपा प्रशासनाला जाग आली आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिकांना त्रास होत आहे. वाहतुकीची समस्या उभी ठाकली आहे. अनेक व्यवसायिकांनी फुटपाथ स्वतःच्या ताब्यात घेतले आहे. फुटपथावर लावण्यात येणाऱ्या दुकानांमुळे पायी चालणाऱ्यांची गैरसोय होते. आयुक्तांनी वाढत्या अतिक्रमणावर नाराजी व्यक्त केली. फुटपाथ व रस्त्यावर लावण्यात येणारी दुकाने, हातठेलेवाल्यांवर कडक कारवाईचे निर्देश दिले. अतिक्रमणावर अंकुश लावण्यासाठी पोलिस व मनपाचे उपद्रव शोध पथकांची मदत मनपा अतिक्रमणविभाग घेणार आहे.
पार्किंग तळांवरही अतिक्रमण
शहरातील विविध भागात सर्रासपणे रस्ते आणि फुटपाथवर दुकाने थाटली जातात. त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होतो. अनेक निःशुल्क पार्किंगतळांवरही काही असामाजिक तत्वांनी ताबा मिळवला आहे. तसेच रंगदारी करुन या भामट्यांकडून पार्किंगचे शुल्क आकारण्यात येतात. या संदर्भात मनपाच्यावतीने धंतोली पोलिस स्थानकात तक्रारही देण्यात आली होती. मात्र यावर काय कारवाई झाली हे गुपीत अद्याप समोर आलेले नाही. टोईंग वाहनाद्वारे रस्त्यावर उभे असलेले वाहन उचलायचे आणि दंड वसूल करायच्या मनपा आणि वाहतूक पोलिसांच्या पवित्र्यावर नागरिकांनी राग व्यक्त केला आहे.