एक्स्प्लोर
पुस्तकप्रेमींना खुणावणारा दिल्लीचा 'जागतिक पुस्तक मेळा'
पर्यावरण आणि वातावरणातला बदल ही यंदाच्या पुस्तक मेळ्याची थीम आहे.
नवी दिल्ली : नवीन वर्ष सुरु झालं की दिल्लीकरांना वेध लागतात ते 'बुक फेअर' अर्थात जागतिक पुस्तक मेळ्याचे. 6 जानेवारीला सुरु झालेला हा पुस्तक मेळा यंदा 14 जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे.
दिल्लीच्या सांस्कृतिक कँलेडरमधला हा महत्वाचा इव्हेंट. आशियातला सर्वात मोठा पुस्तक मेळा अशी याची ख्याती आहे. गेल्या 26 वर्षांपासून सुरु असलेल्या या बुक फेअरचं नुकतंच थाटात उद्घाटन झालं. ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ सुनीता नारायणन, युरोपियन युनियनचे भारतातले राजदूत थॉमस कोझोल्वस्की, नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष बलदेवभाई शर्मा यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला.
दरवर्षी या मेळ्याची एक विशिष्ट थीम असते. पर्यावरण आणि वातावरणातला बदल ही यंदाच्या पुस्तक मेळ्याची थीम आहे. थीमवर आधारित एक विशेष दालनही या ठिकाणी उभारण्यात आलं आहे. 800 हून अधिक प्रकाशक, जगभरातल्या 40 देशांचा सहभाग यंदाच्या पुस्तक मेळाव्यात आहे.
सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत दिल्लीच्या प्रगती मैदानावर हा पुस्तक मेळा सुरु आहे. दिल्लीच्या गुलाबी थंडीत पुस्तकांचा आनंद घेण्यासाठी अनेकांची पावलं सध्या या बुक-फेअरकडे वळत आहेत. दरवर्षी या मेळ्यात कोट्यवधींची उलाढाल होत असते.
लाखो जण या पुस्तक मेळ्याला भेट देतात. त्यामुळे दिल्लीबाहेरचे अनेक प्रकाशक, वाचकही या मेळ्याची आवर्जून वाट पाहत असतात. पुस्तकांची खरेदी-विक्री एवढाच या मेळ्याचा उद्देश नाही. जवळपास 14 मोठे हॉल या प्रदर्शनानं भरले आहेत. कुठे नामवंत लेखकांचा परिसंवाद सुरु असतो, तर कुठे प्रकाशक- लेखकांमधले करार... कॉपीराईटबद्दलचे अनेक व्यवहारही या मेळ्यात होत असतात.
मोबाईल-कॉम्प्युटरच्या युगातही सर्व वयोगटातल्या वाचकांची गर्दी पाहिल्यावर वाचनसंस्कृती अजून टिकून असल्याचा दिलासा इथे आल्यावर नक्की मिळेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement