एक्स्प्लोर
मोदींच्या विरोधकांना एकत्र यायला शरद पवारच का लागतात?
2014 मध्ये मोदी सत्तेत आल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस मोदी-पवार संबंधांची बरीच चर्चा दिल्लीत होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही भेटले नसतील इतक्या वेळा पवार मोदींना भेटत होते. मोदी, जेटली तर बारामतीतही जाऊन आले. जाहीर सभांमध्ये मोदी पवारांना आपले राजकीय गुरु म्हणून लागले होते.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात महाआघाडी बनतेय आणि या महाआघाडीची सगळी खलबतं होत आहेत शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी. 6 जनपथ हे शरद पवारांचे दिल्लीतलं निवासस्थान सध्या जणू या महाआघाडीसाठी वॉर रुमच बनलं आहे. कुठलीही खलबतं करायची असली की देशभरातल्या मोदी विरोधकांना आधार वाटतो तो शरद पवारांचा आणि म्हणूनच सल्लामसलतीसाठी ते पोहोचतात पवारांकडेच. आता कालचं उदाहरण बघा जे राहुल गांधी आणि केजरीवाल आतापर्यंत कधीही एका व्यासपीठावर ती आले नव्हते, त्यांनाही एकत्र आणण्याची किमया केली ती शरद पवार यांनी...
हे सगळं करण्यासाठी केवळ पवारच का हा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. मोदींविरोधात आघाडी उभारण्यासाठी चंद्राबाबू नायडू अनेक नेत्यांना भेटतात. ममता बॅनर्जी ही भेटतात...आंदोलन करतात दिल्लीत येऊन... पण सगळे एकत्र येऊन काही ठरवायची चर्चा करायची वेळ आली की मग मात्र पवारच आठवतात. याचं कारण आहे पवारांच्या सर्वदूर पसरलेल्या जनसंपर्कात. ममता, चंद्राबाबू हे मोदींविरोधात आघाडी उघडत असले तरी इतरांसोबत त्यांच्या डायलॉगला काही मर्यादा पडतात.. जी उणीव या घडीला फक्त पवारच पूर्ण करु शकतात.
2014 मध्ये मोदी सत्तेत आल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस मोदी-पवार संबंधांची बरीच चर्चा दिल्लीत होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही भेटले नसतील इतक्या वेळा पवार मोदींना भेटत होते. मोदी, जेटली तर बारामतीतही जाऊन आले. जाहीर सभांमध्ये मोदी पवारांना आपले राजकीय गुरु म्हणून लागले होते. पण 2014 चा हा मोदीज्वर कमी होऊ लागल्यानंतर पवारांची मोदींबद्दलची भाषा तिखट होऊ लागली.
पवार आणि मोदी यांचे संबंध नेमके कधी बिघडले हा खरंतर कुतूहलाचा प्रश्न आहे. पण जी राजकीय वर्तुळात चर्चा आहे त्यानुसार साखर उद्योगासंदर्भात वारंवार मागणी करुनही केंद्राची हवी तशी मदत मिळाली नाही. हे त्यामागचे एक कारण असावे. दुसरीकडे पवारांच्या बेभरवशी प्रतिमेमुळे त्यांच्यावर विश्वास ठेवायला काँग्रेस आजवर कचरत होती. पण सध्या काँग्रेसची अवस्था इतकी वाईट आहे की त्यांनाही पवारांशिवाय पर्याय दिसत नसावा. उत्तर प्रदेशमध्ये रसातळाला गेल्यानंतर किमान महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यात टिकून राहायचं असेल तर पवार आपल्या बाजूला हवेत हे काँग्रेसनेही ओळखलं असावं. म्हणूनच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी स्वतः बैठकीसाठी अनेकदा शरद पवारांच्याकडे जातात. काँग्रेसमध्ये नव्या पिढीसोबत काम करताना जो मान मिळायला हवा तो देण्याचं भान काँग्रेसनं राखला आहे.
पवारांचं राजकीय व्यक्तिमत्व हे सध्याच्या कुठल्याही प्रादेशिक नेत्यापेक्षा कितीतरी उंच आहे. पण सपा, बसपा किंवा ममता चंद्राबाबू यांना जी खासदारांची ताकद मिळते तितकी पवारांना मिळत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच खासदारांची संख्या दहाच्या आसपास राहिली आहे. उद्या मोदींशिवाय सरकार बनवण्याची वेळ आलीच तर पवारांच्या नावावर सहमती होणार का, हा उत्सुकतेचा प्रश्न आहे. सध्या मोदी विरुद्ध सगळे हे चित्र उभं आहे. त्यात विरोधातल्या सगळ्यांना पवारच प्रामुख्याने रिप्रेझेंट करत आहेत. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीच्या निमित्ताने गुरु विरुद्ध शिष्य एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत असं म्हणायला हरकत नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement