(Source: ECI/ABP News/ABP Majha)
व्हाईट हाऊसकडून अवघ्या 19 दिवसात पंतप्रधान मोदी ट्विटरवर अनफॉलो!
भारताने हायड्रोक्सिक्वोरोक्वीन या औषधाच्या निर्यातीला मंजुरी दिल्यानंतर व्हाईट हाऊसने ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना फॉलो केलं होतं. परंतु अवघ्या 19 दिवसातच व्हाईट हाऊसने मोदींना अनफॉलो केलं आहे.
मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचं राष्ट्रपती कार्यालय व्हाईट हाऊसने अनफॉलो केलं आहे. कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या औषधाच्या निर्यातीला मंजुरी दिल्यानंतर व्हाईट हाऊसच्या ट्विटर हॅण्डलवरुन 10 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींना फॉलो करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर अवघ्या 19 दिवसातच व्हाईट हाऊसने मोदींना अनफॉलो केलं. व्हाईट हाऊसने अचानक हे पाऊल उचलल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
व्हाईट हाऊसने पंतप्रधान मोदी, पंतप्रधान कार्यालय आणि राष्ट्रपती भवनासह भारताचे एकूण पाच ट्विटर हॅण्डल फॉलो केले होतं. यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, अमेरिकेतील भारतीय दूतावास आणि भारतातील अमेरिकन दूतावास या ट्विटर हॅण्डलला फॉलो केलं होतं. याशिवाय भारतामधील अमेरिकेचे राजदूत केन जस्टर यांनाही फॉलो करण्यात आलं होतं.
PM Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील एकमेव नेते ज्यांना व्हाईट हाऊसही ट्विटरवर करते फॉलो
व्हाईट हाऊसचा निर्णय आश्चर्यकारक व्हाईट हाऊसच्या ट्विटर हॅण्डलवरुन फॉलो केले जाणारे पंतप्रधान मोदी हे जगातील एकमेव राजकीय नेते होते. भारत सातत्याने अमेरिकेची मदत करत असतानाही, अमेरिकेच्या राष्ट्रपती कार्यालयाने उचललेलं हे पाऊल आश्चर्यकारक असल्याचं म्हटलं जात आहे. कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत भारताने अमेरिका आणि ब्रिटन यासारख्या देशांसह जगभरातील अनेक देशांना मदतीचा हात पुढे केला आहे. या देशांनी नेत्यांनी पंतप्रधान मोदींचं तोंडभरुन कौतुकही केलं होतं.
दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्रपती कार्यालयाने अपवादात्मक परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विटर हॅण्डलला फॉलो केलं होतं. यामुळे आता व्हाईट हाऊसच्या ट्विटर हॅण्डलवरुन मोदींना अनफॉलो करण्यात आलं आहे.