राहुल गांधींच्या विदेश दौऱ्यांमागे दडलंय काय?
काँग्रेस पक्षाचा आज 136 वा स्थापना दिवस होता. पण पक्षाच्या या कार्यक्रमालाही ते हजर नव्हते. त्यामुळे राहुल गांधींच्या विदेश दौऱ्यावरुन पुन्हा एकदा भाजपनं टोलेबाजी सुरु केली.
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचा आज 136 वा स्थापना दिवस आहे. पण या कार्यक्रमासाठी राहुल गांधी देशात नव्हते. कालच त्यांनी इटली गाठलं आहे. राहुल गांधींच्या या सततच्या विदेश दौऱ्यावरुन ते याआधीही टीकेचे लक्ष्य ठरले आहेत. आता तर पक्षाची दुरावस्था असताना, देशात शेतकरी आंदोलन पेटलेलं असताना राहुल गांधी पुन्हा एकदा विदेश दौऱ्यावर आहेत.
"वीर तुम बढे चलो, धीर तुम बढे चलो..."सकाळी हे ट्विट केल्यानंतर राहुल गांधी आता शेतकरी आंदोलनात काय आक्रमक भूमिका घेत आहेत. याकडे कुणी नजर लावून बसला असेल तर त्यांच्या पदरी घोर निराशाच आली. कारण हे ट्विट करुन राहुल गांधी यांनी इटलीचं विमान पकडलं. काँग्रेस पक्षाचा आज 136 वा स्थापना दिवस होता. पण पक्षाच्या या कार्यक्रमालाही ते हजर नव्हते. त्यामुळे राहुल गांधींच्या विदेश दौऱ्यावरुन पुन्हा एकदा भाजपनं टोलेबाजी सुरु केली.
राहुल गांधी हे आता काँग्रेसचे अध्यक्ष नाहीत. ते केवळ वायंनाडूमधून काँग्रेसचे खासदार आहेत. पण तरीही त्यांच्या सुट्ट्यांची इतकी चर्चा का सुरु आहे? याचं कारण अध्यक्ष नसले तरी पक्षातले सगळे अधिकार अद्याप तरी गांधी कुटुंबाकडेच आहेत.
भाजप नेत्यांनी राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यावर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांनीही उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. राजीव सातव म्हणाले की, "आपल्या घरातलं कोणी आजारी असेल तर कोणीही सगळ्या गोष्टी सोडून जाईल. त्यांच्या आजीची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी राहुल गांधी इटलीला गेले आहेत. कोरोनाचं संकट मोठं असेल असं राहुल गांधी यांनी फेब्रुवारीमध्ये सांगितलं होतं त्यावर सरकारने लक्ष दिलं? लाखो शेतकरी सीमेवर आंदोलन करत आहेत, सरकार लक्ष द्यायला तयार आहेत? मागच्या सहा वर्षांपासून पंतप्रधान मोदी एकही पत्रकार परिषद घ्यायला तयार नाहीत, त्याबद्दल कोणी चर्चा करायला तयार नाही. देशासमोरच्या कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नांना मोदी सरकारने उत्तर दिलेलं नाही.
राहुल गांधी आणि त्यांच्या या विदेश दौऱ्यांचा एक इतिहास आहे. मागच्या वर्षी नागिरकत्व कायद्यावरुन आंदोलन पेटलं होतं तेव्हा राहुल गांधी विदेशात होते. दिल्लीतल्या दंगलीवरुन रान पेटलं होतं, तेव्हाही ते सुट्टीवर होते. महाराष्ट्र, हरियाणाच्या विधानसभा निवडणुकांसाठी रणनीती आखली जात होती, तेव्हा ते विदेशात होते.आणि आता जेव्हा 33 दिवसांपासून शेतकरी रस्त्यावर आंदोलन करतायत, तेव्हा राहुल गांधी विदेशात आहे.
राहुल गांधी यांच्या विदेश दौऱ्याचा उल्लेख संसदेतही झालेला आहे. गांधी कुटुंबाचं एसपीजी प्रोटेक्शन काढून घेताना हा निर्णय कसा योग्य आहे याबाबत आकडेवारी अमित शाहांनी संसदेत आकडेवारी दिली होती. राहुल गांधी 2015 पासून 2019 पर्यंत तब्बल 246 वेळा विदेश दौऱ्यावर गेल्याचा त्यांचा दावा होता. म्हणजे सरासरी काढली तर वर्षाला 60 वेळा आणि महिन्याला 5 वेळा... एसजीपी प्रोटोकॉलनुसार प्रत्येक वेळी विदेश दौऱ्यावर जाताना त्याची सविस्तर माहिती द्यावी लागते. पण राहुल गांधी ती न देताच जात असल्याचा आरोप त्यांनी सभागृहात केला होता.
पक्षाला पूर्णवेळ काम करणारा अध्यक्ष हवा अशी मागणी काँग्रेसमधलेच नेते पत्र लिहून करत आहेत. आत्ता कुठे राहुल गांधी पुन्हा सक्रीय होताना दिसत होते. शेतकरी कायद्यावर त्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. त्यानंतर लगेचच पुन्हा ते विदेशात निघून गेले आहेत.
काँग्रेस पक्षाचा आज 136 वा स्थापन दिवस साजरा झाला. एकीकडे कोरोना संकटामुळे अध्यक्ष सोनिया गांधी हजर नव्हत्या, तर दुसरीकडे राहुल गांधी विदेशात आहे. त्यामुळे प्रियंका गांधी आणि इतर ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. नवा, पूर्णवेळ अध्यक्ष कधी निवडला जाणार याची चिंता पक्षाला असतानाच आता राहुल गांधीच्या या दौऱ्यामुळे पुन्हा त्यांच्या नेतृत्वशैलीचे वाद उद्भवले जात आहेत.
संबंधित बातम्या :