India Pakistan 1971 War : ऑपरेशन ईगल: पडद्याआड राहिलेली 'रॉ'ची यशस्वी मोहीम
India Pakistan 1971 war: भारत-पाकिस्तानच्या 1971 मधील युद्धात भारतीय लष्करासह गुप्तचर संस्था 'रॉ'चे ही मोठे योगदान होते.
Vijay Divas Bangladesh Mukti Din : बांगलादेश मुक्तिसंग्रामात भारतीय सैन्याने अभूतपूर्व पराक्रम दाखवत पाकिस्तानचे दोन तुकडे केले. पाकिस्तानच्या विरोधातील या संघर्षामध्ये भारतीय सैन्यासह देशाची गुप्तचर संघटना रॉचा ही मोलाचा वाटा होता. युद्धपूर्व काळात आणि युद्धा दरम्यान रॉ ने केलेली कामगिरी फारशी प्रकाशझोतात आली नव्हती. रॉ आणि भारतीय लष्कराने समन्वय साधत तत्कालीन पूर्व पाकिस्तानमध्ये (सध्याचा बांगालदेश) पाकिस्तानी सैन्याला अनेक आघाड्यांवर निष्प्रभ करत धूळ चारली. 'ऑपरेशन ईगल' ही मोहीम देखील पडद्याआड राहिली होती.
तत्कालीन पूर्व पाकिस्तानमधील चित्तगावमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या मदतीला मिझो बंडखोर होते. ईशान्य भारतात दहशतवादी कारवायास करण्यासाठी पाकिस्तानने या बंडखोरांना आश्रय दिला होता. मिझो बंडखोर हे गनिमी युद्धासाठी पारंगत होते. पाकिस्तानी सैन्याला त्याची मोठी मदत मिळत होती. पूर्व पाकिस्तानमध्ये निर्णायक आघाडी घेण्यासाठी चित्तगाववर ताबा मिळवण्याचे मोठे आव्हान भारतासमोर होते. अखेर भारताने या मोहिमेत आपली स्पेशल फ्रंटियर फोर्स (SFF) ही खास तुकडी युद्धात उतरवली. विशेष म्हणजे या तुकडीतील सैन्य भारतीय नव्हते.
कोण होते SFF?
चीनसोबत झालेल्या 1962 च्या युद्धात पराभव झाल्यानंतर भारताने चीनच्या आगळीकीला उत्तर देण्यासाठी अनेक पर्यायांवर विचार केला होता. चीनला त्यांच्या भाषेत उत्तर देण्याची आवश्यकता होती. भारताने बंडखोर तिबेटीयन युवकांना प्रशिक्षित करण्याची योजना आखली. चीन सरकारला वैतागून तिबेटमधील अनेकजण भारतात निर्वासित म्हणून शरण आले होते. यातील काहीजणांना भारतीय लष्कराने गुप्तपणे प्रशिक्षित केले होते. मात्र, चीनसोबत नंतर युद्धाची स्थिती निर्माण न झाल्याने हे सैन्य कायम संधीच्या शोधात होते. या SFF ची ब्रिगेडियर सुजान सिंह यांच्या हाती होती. SFF च्या स्थापनेत रॉचे संस्थापक रामेश्वरनाथ काव यांची प्रमुख भूमिका होती.
ऑपरेशन ईगलची सुरुवात
चितगाव आणि चितगाव डोंगराळ भाग हे गनिमी युद्धासाठी सर्वात योग्य क्षेत्र मानले गेले. पाकिस्तानी सैन्याशिवाय स्थानिक मिझो बंडखोरांचा बिमोड करण्याची आवश्यकता होती. त्यासाठी SFF हा सर्वोत्तम पर्याय होता. तिबेटीयन जवान आणि मिझो बंडखोरांची शरीरयष्टी सारखीच होती. त्यामुळे चपळता, वेगवान हालचालीने हल्ला करण्यासाठी SFF योग्य पर्याय होता. त्याशिवाय या मोहिमेद्नारे मिझो बंडखोरांची डोकेदुखी संपवण्याची भारताला संधी होती.
SFF आणि भारतीय लष्कराने ऑपरेशन ईगलची सुरुवात केली. शत्रूंच्या ठिकाणांवर हल्ला करा, त्यांना नेस्तानाबूत करा, शक्य होईल तेवढे नुकसान करा आणि पुन्हा माघारी तळावर फिरा असे आदेश SFF ला देण्यात आले होते. वेगवान हल्ल्यांमुळे SFFच्या जवानांना 'फँटम इन हिल्स' असे म्हटले जाऊ लागले. या जवानांची कारवाई एक दंतकथाच झाली होती. हे जवान कुठून तरी येतात आणि कारवाया करून जंगलात अदृष्य व्हायचे. चितगावच्या डोंगराळ भागात त्यांनी कारवाईस सुरुवात केल्यानंतर दहा दिवसांत त्यांनी पाकिस्तान, मिझो बंडखोरांचे अनेक तळ ताब्यात घेतले. अनेक पूल उद्धवस्त केले. धरणाचेही नुकसान केले. पाकिस्तानची विविध आघाड्यांवर कोंडी केली होती. त्याशिवाय मिझो बंडखोरांचे तळ, आश्रयस्थाने उद्धवस्त केली. पाकिस्तानी लष्कर आणि मिझो बंडखोरांना म्यानमारमध्ये पळून जाण्याचा मार्गही बंद केला होता. या युद्धात SFF च्या तिबेटीय कमांडोंनी दाखवलेले शौर्य मोठे होते. या लढाईत SFFचे 56 कमांडो शहीद झाले तर जवळपास 190 जण जखमी झाले.
SFF ने चितगाव बंदर ताब्यात घेण्याची तयारी केली होती. मात्र, त्यांना परवानगी नाकारण्यात आली होती. SFF च्या कमांडोमुळे चितगावपर्यंत जाण्याचा भारतीय लष्कराचा मार्ग मोकळा झाला होता. SFFने कमांडोंनी हा पराक्रम दाखवला नसता तर भारताला विजयासाठी आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागली असती.
SFF सध्या काय करते?
SFF भारतीय लष्कराचा एक भाग आहे. मागील वर्षी झालेल्या गलवान संघर्षानंतर भारतीय सैन्याने लडाखमधील काही महत्त्वाच्या उंच ठिकाणांवर ताबा मिळवला होता. त्यामध्ये SFF च्या जवानांचा सहभाग होता.
पाहा : सिंहासन - बांगलादेशची निर्मिती आणि भारत-पाक युद्ध