Uttarkashi Cloudburst: देवभूमी उत्तराखंडमध्ये महाप्रलय, ढगफुटीसदृश पावसामुळे उत्तरकाशीतील धरालीत हाहाकार; लष्करासह बचाव पथके घटनास्थळी दाखल
Uttarkashi Cloudburst: देवभूमी उत्तराखंडमधील धराली गावात ढगफुटीची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत 50 ते 60 लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे आणि ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Uttarkashi Cloudburst: देवभूमी उत्तराखंडमधील धराली गावात ढगफुटीची घटना समोर आली आहे. उत्तराखंड जिल्ह्यातील धारली बाजार परिसरात भूस्खलन झाले असून शेकडो घरं आणि नागरिक यात ढिगाऱ्याखाली आल्याची माहिती आहे. डोंगरावरून मोठ्या प्रमाणात ढिगारा निवासी भागांकडे वाहताना पुढे आलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत 50 ते 60 लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे आणि ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात विध्वंसाचे दृश्य समोर आलं आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि स्थानिक प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
तर दुसरीकडे या घटनेनंतर उत्तराखंड सरकारने तीन आयएएस अधिकाऱ्यांना तैनात केले आहे. उत्तराखंड सरकारने या संदर्भात अधिकृत आदेशही जारी केला आहे. उत्तराखंड सरकारच्या आदेशानुसार, उत्तरकाशी जिल्ह्यातील भटवाडी ब्लॉकमधील धराली गावात ढगफुटीमुळे झालेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर, आपत्तीग्रस्त भागात बचाव आणि मदत कार्याचे समन्वय साधण्यासाठी आयएएस अभिषेक रुहेला (2015 बॅच), आयएएस मेहरबान सिंग बिष्ट (2016 बॅच) आणि आयएएस गौरव कुमार (2017 बॅच) यांना तैनात करण्यात आले आहे. पुढील आदेशापर्यंत या तीन आयएएस अधिकाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे.
भारतीय सैन्याकडून मदतकार्य जारी
धराली येथील खीरगड येथे झालेल्या भीषण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, 14 राजरिफचे कमांडिंग ऑफिसर कर्नल हर्षवर्धन हे आपल्या 150 कर्मचाऱ्यांचे युनिटसह या परिसरात बचाव आणि मदत कार्यात नेतृत्व करत आहेत. युनिटशी संपर्क तुटला असूनही आणि युनिटच्या बेसवर प्रतिकूल परिणाम झाला असूनही तसेच अद्याप 11 कर्मचारी बेपत्ता असल्याची भीती असूनही हे युनिट प्रयत्नांची पराकाष्ठा करत मदत पोहचवत आहे. अशी माहिती लेफ्टनंट कर्नल मनीष श्रीवास्तव यांनी दिलीय.
काय म्हणाले NDRFचे डीआयजी मोहसीन शाहिदी?
एनडीआरएफचे डीआयजी मोहसीन शाहिदी यांनी उत्तरकाशीमध्ये सुरू असलेल्या बचाव कार्याची माहिती दिली. ते म्हणाले, "माहिती मिळताच, आमच्या एनडीआरएफच्या तीन पथकांना तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आले. डेहराडून विमानतळावर विमानाने पोहोचण्यासाठी दोन अतिरिक्त पथके तयार आहेत, परंतु हवामानामुळे सध्या एअरलिफ्टिंग शक्य नाही आणि आमच्या पथके लवकरच बाधित भागात पोहोचण्याची शक्यता आहे."
ते म्हणाले, "एनडीआरएफचे लक्ष अजूनही आपत्तीग्रस्त गावावर आहे, जिथे बचाव कार्य सुरू आहे. आम्हाला माहिती मिळाली आहे की लष्कराची टीम, एसडीआरएफ, आयटीबीपी आणि स्थानिक प्रशासन बाधित भागात मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहे." एनडीआरएफचे डीआयजी मोहसीन शाहिदी म्हणाले, "अशा आपत्तींमध्ये बचाव कार्य करणे खूप कठीण असते कारण लोक ढिगाऱ्याखाली अडकतात आणि त्यांना बाहेर काढणे आमच्यासाठी एक आव्हानात्मक काम असते. बचाव कार्यादरम्यान, बचाव कामगारांनाही धोका असतो आणि म्हणूनच बचाव कार्यात विशेष उपकरणे आणि दोरींचा वापर केला जातो. एनडीआरएफचे 100 बचाव कर्मचारी बाधित भागात उपस्थित आहेत."
नांदेड जिल्ह्यातील सर्व 11 जण सुखरूप
उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली येथे ढगफुटी झाली असून, ज्यामुळे खीरगंगा नदीला मोठा पूर आला आहे. अनेक घरांचे नुकसान झाले आहे, आणि काही ठिकाणी भूस्खलन देखील झाले आहे. उत्तराखंडमध्ये अतिवृष्टी झाली आहे. अनेक ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे भूस्खलन आणि पूर आले आहेत. उत्तरकाशी जिल्ह्यात महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील मौ. डोणगाव येथील 11 जण केदारनाथ बद्रीनाथ यात्रेसाठी 1 ऑगस्ट 2025 रोजी नांदेड येथून निघाले होते. त्यांचा संपर्क झाला असून ते सर्व सद्यस्थितीत घटनास्थळापासून 150 किमी दूर असून सर्व 11 जण सुखरूप आहे. जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्रास सचिन पत्तेवार यांनी कळविले आहे.
उत्तर काशी येथे घडलेल्या परिस्थितीवर पालकमंत्री अतुल सावे हे लक्ष ठेवून असून आवश्यकते नुसार कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी यांना केल्या असून नांदेड जिल्ह्यातील अजून कुणी उत्तराखंड येथे अडकून पडले असेल तर त्यांच्या नातेवाईकांनी संबंधित तालुक्यातील तहसीलदार यांच्याकडे किंवा जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे (02462) 235077 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























