(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uttarkashi Tunnel Rescue : 41 मजुरांचा जीव वाचवण्यासाठी धडपड, बरकोटच्या टोकापासूनही ड्रिलिंग सुरू
Uttarkashi Silkyara Tunnel Accident : उत्तरकाशीमध्ये 41 मजुरांचा जीव वाचवण्याचा लढा सुरूच आहे, देशभरात प्रार्थना केल्या जात आहेत, बरकोटच्या टोकापासूनही ड्रिलिंग सुरू आहे.
Uttarakhand Tunnel Accident : उत्तराखंडच्या (Uttarakhand) उत्तरकाशीमध्ये (Uttarkashi) बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना वाचवण्यासाठी बरकोट येथे सरळ उभ्या मार्गाने ड्रिलिंगसाठी एक जागा निश्चित करण्यात आली आहे. बोगद्याच्या वरच्या भागात सरळ मार्गाने बोगदा खोदण्यासाठी मशीन बसविण्याचं काम सुरू झालं आहे. बोगद्यात बाजूनेही उभ्या आणि आडव्या ड्रिलिंग करण्यासाठी पावले उचलली आहेत. सिल्क्यराकडे औजर मशीनच्या साह्याने आडव्या दिशेने खोदण्याचे काम रात्री सुरू होते. मजुरांना बाहेर काढण्यासाठी उभ्या, आडव्या आणि तिरप्या मार्गाने बोगदा खणण्याचे काम सुरु आहे. 41 मजुरांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात सुरु आहेत. 12 नोव्हेंबर रोजी उत्तरकाशीमध्ये सिल्क्यरा बोगद्याचा काही भाग कोसळला होता. तेव्हापासून गेले 11 दिवस हे मजूर आतमध्ये अडकलेले आहेत.
कामगारांच्या सुटकेसाठी छोटा बोगदा बांधण्याचं काम सुरू
सोमवारी रात्री बरकोट पोळगाव टेल येथून उर्वरित 483 मीटर भागात छोट्या बोगद्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. हा बोगदा चार मीटर व्यासाचा बांधला जात आहे. आतापर्यंत या बोगद्याचं 6.4 मीटर खोदकाम करण्यात आलं आहे. यासोबतच शॉट काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यानंतर बॅलेस्टिक मशीनच्या वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे बॅलेस्टिकचं काम रात्री बंद झालं होतं.
#WATCH | Uttarkashi (Uttarakhand) tunnel rescue | Location has been identified for vertical drilling to bring out 41 workers trapped inside Silkyara Tunnel.
— ANI (@ANI) November 22, 2023
A part of the Silkyara tunnel collapsed in Uttarkashi on November 12. pic.twitter.com/EPYq0eEBNE
एनडीआरएफच्या दोन पथके घटनास्थळी
एनडीआरएफच्या दोन पथके मजूर आणि तांत्रिक तज्ज्ञांच्या मदतीसाठी घटनास्थळी तैनात आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) चे सदस्य लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांनी उत्तरकाशीतील बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या बचाव कार्याबाबत माहिती देताना सांगितलं की, NDRF च्या दोन टीम कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी घटनास्थळी तैनात आहेत. बोगद्यात अडकलेल्या तांत्रिक तज्ज्ञांना किंवा कामगारांना वाचवण्यासाठी त्यांना कोणत्याही परिस्थितीत बोगद्यात मदत पाठवण्याची गरज भासली तर NDRF मदती तयार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
बचावकार्यात आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची मदत
उत्तरकाशीमध्ये सुरू असलेल्या बचावकार्यात NDRF, ITBP, आर्मी इंजिनीअर्स, SDRF, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा, BRO आणि भारत सरकारच्या इतर तांत्रिक एजन्सी यांसारख्या विविध टीम बचाव कार्यात सहभागी आहेत. यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ घटनास्थळी उपस्थित असल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (NDMA) सदस्य लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांनी दिली आहे. त्यांनी पुढे सांगितलं आहे की, विविध एजन्सी तिथे काम करत आहेत. हा खूप आव्हानात्मक प्रयत्न आहे. तीन ते चार आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ देखील घटनास्थळी आले आहेत. बोगद्यामध्ये अडकलेल्या कामगारांना आतमध्ये पुरेशी जागा आहे. तसेच त्यांना पाईपद्वारे ऑक्सिजन, अन्न, औषध आणि इतर आवश्यक गोष्टीचा पुरवठा केला जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :