उत्तर प्रदेशमधील फिल्मसिटीसाठी एकता कपूर, सुभाष घई, इरॉससह 20 कंपन्या उत्सुक
योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या भेटीवरून महाराष्ट्रात चांगलेच राजकारण रंगले होते. पण आता योगी आदित्यनाथ यांचे स्वप्न साकार होताना दिसत आहे.
मुंबई : गेल्या वर्षी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( (Yogi Adityanath) मुंबईला आले होते. मुंबईतील फिल्मसिटीप्रमाणे उत्तर प्रदेशमध्येही भव्य फिल्मसिटी तयार करण्याची योजना त्यांनी आखली होती. आणि त्यासाठीच बॉलिवूडच्या लोकांना भेटण्यासाठी ते मुंबईला आले होते. त्यांच्या या भेटीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका करीत हिंमत असेल तर फिल्मसिटी घेऊन जाऊन दाखवा असे आवाहन दिले होते. शिवसेनेचे मुखपत्र सामनामधील अग्रलेखातही योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करण्यात आली होती. योगी आदित्यनाथ यांच्या भेटीवरून महाराष्ट्रात चांगलेच राजकारण रंगले होते. पण आता योगी आदित्यनाथ यांचे स्वप्न साकार होताना दिसत आहे.
गुरुवारी उत्तर प्रदेशच्या गौतम बुद्ध नगरात तयार करण्यात येणाऱ्या फिल्मसिटीबाबत एक बैठक झाली. या बैठकीत एकता कपूर, सुभाष घई, इरॉससह जवळ-जवळ 20 कंपन्यांच्या प्रतिनिधींनी भाग घेऊन चर्चा केली. 23 नोव्हेंबर रोजी फिल्मसिटीसाठी जागतिक निविदा मागवण्यात आल्या होत्या. बुधवारी प्री-बीड बैठक आयोजित करण्यात आली होती. या फिल्मसिटीच्या निर्मितीची जबाबदारी यमुना विकास प्राधिकरणाकडे सोपवण्यात आलेली आहे. प्राधिकरणाने बैठकीत भाग घेतलेल्या कंपन्यांना 10 डिसेंबरपर्यंत प्रश्न आणि अडचणी पाठवण्यास सांगितले आहे. कंपन्यांनी पाठवलेल्या अडचणींवर विचार करण्यासाठी शासन स्तरावर समिती स्थापन करून त्या तातडीने सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या फिल्मसिटीमध्ये प्रत्येक राज्याप्रमाणे गावं उभारली जाणार असून शूटिंगसाठी आवश्यक मंदिर, चर्च, गुरुद्वारा, बस स्टॉप, एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन, धबधबे, बागा, पोलीस स्टेशन, जेल, न्यायालय, चाळी, हॉल्पिटल, पेट्रोल पंप, दुकानं, शहरंही उभारली जाणार आहेत. स्टेट ऑफ आर्ट स्टुडियो, प्री आणि पोस्ट प्रोडक्शनच्या सुविधा दिल्या जाणार आहेत. तसेच येथे स्पेशल इफेक्टस स्टुडियोही तयार केला जाणार आहे. एक हेलिपॅडही तयार केले जाणार असून एक यूनिव्हर्सिटीही सुरु केली जाणार आहे. स्टुडियोत चित्रपट, टीव्ही कार्यक्रम, रेडियो कार्यक्रम, जाहिराती, ऑडियो रेकॉर्डिंग, फोटोग्राफी आणि डिजिटल आर्टची सुविधाही उपलब्ध केली जाणार आहे. कलाकारांसाठी मेकअप रूम, स्टोर रूमही तयार केले जाणार आहेत. एवढंच नव्हे तर थ्री डी स्टुडियो आणि 360 अंशात फिरणारे सेटही उभारले जाणार आहेत. कलाकार आणि अन्य स्टाफसाठी पंचतारांकित हॉटेल, पर्यटनाला वाव मिळावा म्हणून विशेष स्टुडियो, पायाभूत सुविधा आणि कॉमन फॅसिलिटी सेंटर तयार केले जाणार आहे.
तीन टप्प्यात फिल्मसिटीची निर्मिती केली जाणार असून 2029 पर्यंत फिल्मसिटी पूर्णपणे तयार करण्याची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची योजना आहे. पहिल्या टप्प्यात स्टुडियो, ओपन एरिया, एम्यूजमेंट पार्क, राजवाडे इत्यादी तयार केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यातच शूटिंगसाठी आवश्यक 80 टक्के सुविधा देण्याची योजना आहे.
यमुना विकास प्राधिकरण क्षेत्रातील सेक्टर 21 मध्ये फिल्मसिटी प्रस्तावित असून यासाठी 1 हजार एकर जमीन आरक्षित करण्यात आलेली आहे. यापैकी 220 एकर जमीन व्यावसायिक उपयोगासाठी आणली जाणार आहे. पीपीपी मॉडेलवर अत्यंत आधुनिक पद्धतीने ही फिल्मसिटी उभारण्यात येणार आहे. या बैठकीत इरॉस इंटरनॅशनल, बालाजी टेलिफिल्म्स, एलएंडटी, एआईडीए मॅनेजमेंट, श्री हंस ग्रीन टेक्नोलॉजी, इवेंटम टेक्नोलॉजी, श्री टीवी, ओरियंट, गोदरेज, आयरन स्टोर प्रा. लि., केईसी इंटरनॅशनल लि.सहित अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यापैकी काही कंपन्यांच्या प्रतिनिधींनी ऑनलाईन हजेरी लावली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या :