Pune Drama : पुण्यातील 'आपकी अमरी' या नाटकाची 'भारंगम' मध्ये निवड... नाट्यरसिकांत उत्साह
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, दिल्ली आयोजित भारत रंग आंतरराष्ट्रीय महोत्सवात ‘आपकी अमरी’ या नाटकाची निवड झाली आहे. हे नाटक मूळच्या मराठीतील 'तुझी अमरी' चे रुपांतर आहे.
पुणे : 'भारंगम' या मानाच्या नाट्य महोत्सवात पुण्यातील 'आपकी अमरी' या हिंदी नाटकाची निवड करण्यात आली आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, दिल्ली (NSD) आयोजित भारत रंग आंतरराष्ट्रीय महोत्सवात एकूण 701 नाटकांमधून केवळ 87 नाटकांची निवड करण्यात आली आहे. यात 'आपकी अमरी' या नाटकाचा समावेश आहे.
'आपकी अमरी' हे चित्रकार अमृता शेरगीलच्या आयुष्यावर आधारीत दोन अंकी नाटक आहे. कला, इतिहास संशोधक रमेशचंद्र पाटकर आणि चित्रकार विवान सुंदरम यांच्या पुस्तकांवर आधारित असलेल्या या नाटकाची संहिता संकलन आणि दिग्दर्शन शेखर नाईक यांचे आहे.
मूळच्या मराठीतील नाटकाचे हिंदीत रुपांतर
मूळ मराठीमध्ये असलेल्या 'तुझी अमरी' या नाटकाचे हिंदीमध्ये भाषांतर करण्यात आले आहे. या नाटकात प्रमुख भूमिकेत शर्वरी लहाडे आणि रसिका वाखारकर आहेत. चैतन्य कुलकर्णी आणि नचिकेत देवस्थळी यांनी या नाटकाचं हिंदी रुपांतर केले आहे. या नाटकाला संगीत चैतन्य आडकर यांनी दिले आहे. नेपथ्य राज सांडभोर, वेशभूषा वैशाली ओक, रंगभूषा काजल गोयल, प्रकाशयोजना प्रफुल्ल दिक्षित, निर्मिती व्यवस्था नयन पडवळ आणि गायत्री चक्रदेव, तर दृकश्राव्य प्रसाद कुलकर्णी, रंगमंच व्यवस्था श्रीकांत गदादे, अनुजा देशमुख, सूरज कदम आणि रवी पाटील यांनी सांभाळली आहे.
‘आपकी आमरी’ या नाटकाची निर्मिती शेखर नाईक प्रॉडक्शनची आहे. नाट्यवर्तुळात मानाच्या समजल्या जाणाऱ्या अशा महोत्सवात पुण्यातील नाटकाची निवड झाल्यामुळे रसिकांना या नाटकाची ओढ लागली आहे.
भारंगम म्हणजे काय?
'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'चा (NSD) देशातील अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सव 'भारंगम' येत्या 1 ते 21 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. '22 वा भारत रंग महोत्सव’ देशातला एकमेवाद्वितीय असा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाटकांचा महोत्सव आहे. त्यामुळे 'एनएसडी'च्या माजी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा 22 वा भारंगम नवी दिल्ली आणि प्रमुख 6 शहरांमध्ये होणार आहे. हा महोत्सव दिल्लीत 21 दिवस आणि प्रत्येक केंद्रात 7 दिवस आयोजित करण्यात येणार आहे. नाशिक, इंदूर, आगरतळा, राउरकेला, बडोदा आणि हैदराबाद या केंद्रावरही महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या :