दिल्ली, मुंबई कोविड-19च्या तिसऱ्या लाटेच्या शिखरावर? काय म्हणत आहेत तज्ञ
डॉ समीरन पांडा (Dr Samiran Panda) यांनी माहिती दिली आहे.
Covid-19 : डॉ समीरन पांडा (Dr Samiran Panda) हे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (Indian Council of Medical Research) महामारीविज्ञान विभागाचे प्रमुख आहेत. त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये दिलेल्या माहितीनुसार,कोविड-19 महामारीच्या देशातील तिसऱ्या लाटेत दिल्ली (Delhi) आणि मुंबईने (Mumbai) शिखर गाठले आहे की नाही याची पुष्टी आत्ताच करणं हे खूप घाईचं ठरेल.
मुलाखतीमध्ये डॉ समीरन पांडा यांनी सांगितले, 'दिल्ली आणि मुंबईने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनं शिखर गाठले आहे, हे सांगण्यापूर्वी आपल्याला आणखी दोन आठवडे थांबावे लागेल. हे आत्ताच सांगणं खूप घाईचं ठरेल. असं सांगून आम्हाला कोणताही ट्रेंड निर्माण करायचा नाही. केवळ केसेस आणि पॉझिटिव्हिटी रेटमध्ये घट झाल्याच्या आधारावर आम्ही काही सांगू शकत नाही. '
डॉ समीरन पांडा म्हणाले की, दिल्ली आणि मुंबई या दोन मोठ्या महानगरांमध्ये कोविड-19 च्या ओमिक्रॉन आणि डेल्टा केसेसचे प्रमाण अनुक्रमे 80 आणि 20 टक्के आहे. भारतातील विविध राज्ये सध्या महामारीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
'गणितीय अंदाज दर्शविते की ओमिक्रॉन व्हेरियंट भारतात 11 डिसेंबरपासून तीन महिने टिकेल. 11 मार्चनंतर थोडासा दिलासा मिळेल.' असं डॉ समीरन पांडा यांनी सांगितलं.
काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमायक्रॉन जरी डेल्टाचा प्रसार कमी करुन त्याविरुद्ध प्रतिकार शक्ती वाढवत असेल, पण यासाठी लसीकरण होणं अत्यंत आवश्यक आहे. लस घेतली नसल्यास प्रतिकार शक्ती वाढणार नाही असं त्या म्हणाल्या होत्या.
संबंधित बातम्या
ओमायक्रॉन डेल्टा व्हेरियंटविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवेल, पण यासाठी 'ही' गोष्ट करणं महत्त्वाचं- WHO
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha