अखेर 'मनाचे श्लोक' चित्रपटाचे नाव बदलले; नवीन नावासह 16 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची प्रमुख भूमिका असलेला मनाचे श्लोक हा चित्रपट नावावरुन वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.

मुंबई : चित्रपट आणि वाद, चित्रपटाचे नाव अन् वाद हे काही नवीन काही. दर काही महिन्यांनी एखाद्या चित्रपटाच्या नावावरुन, व्यक्तीरेषेवरुन किंवा चित्रपटातील काही दृश्यांवरुन आक्षेप घेत वाद निर्माण होत असल्याचं पाहायला मिळतं. मराठी सिनेसृष्टीतही आता हा वाद दिसून येत असून मनाचे श्लोक (Manache shlock) ह्या चित्रपटाच्या नावावरुन वाद निर्माण झाला आहे. चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेत “मनाचे श्लोक” हा संत रामदासस्वामींच्या ग्रंथाशी संबंधित पवित्र शब्द असल्याने त्याचा वापर करणे धार्मिक भावना दुखावणारे आहे, अशी भूमिका काही धार्मिक संघटनांनी मांडली होती. त्यानंतर, आता चित्रपटाचे (Cinema) नाव बदलण्यात आल्याची माहिती आहे.
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची प्रमुख भूमिका असलेला मनाचे श्लोक हा चित्रपट नावावरुन वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यामुळे, चित्रपट प्रदर्शनाच्या दिवशीच पुण्यात काही धार्मिक संघटनांनी एकत्र येत चित्रपटाचे शो बंद पाडले होते. 10 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता, पण पुण्यातील अनेक चित्रपटगृहात जाऊन हिंदूत्ववादी धार्मिक संघटनांनी चित्रपटाच्या नावाला विरोध करत चित्रपटाचे शो बंद पाडले होते. तसेच, जोपर्यंत चित्रपटाचे नाव बदलले जात नाही, तोपर्यंत सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका देखील घेतली होती. त्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही या वादात उडी घेत कलाकार आणि निर्मात्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे, अशी भूमिका घेतली होती. अखेर, आता नव्या नावासह हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित मनाचे श्लोक हा चित्रपट आता 'तू बोल ना' या नव्या नावासह प्रदर्शित होत असून 16 ऑक्टोबर रोजी गुरुवारी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मनाचे श्लोक म्हणजेच तू बोल ना हा चित्रपट मानवी मन, विचार, नैतिक संघर्ष आणि समाजातील वास्तव यावर प्रकाश टाकतो. धार्मिक नाव असणं म्हणजे धार्मिक विषय असणं नव्हे. शीर्षक हे एक तत्त्वज्ञानात्मक रूपक आहे, आणि कलात्मक अभिव्यक्ती म्हणून त्याचा आदर केला जाणं आवश्यक आहे, असेही अनेकांचे मत होते. मात्र, चित्रपटाच्या दिग्दर्शकाने नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
उच्च न्यायालयाकडून नावाला ग्रीन सिग्नल (Highcourt allow manache shlock)
मराठी चित्रपट 'मनाचे श्लोक' या चित्रपटाच्या शीर्षकाचे श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाच्या श्लोकाशी साधर्म्य आहे, त्याचा श्री समर्थ रामदास स्वामींशी काहीही संबंध नाही, असं निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयानं गुरुवारी सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला होता. यासंदर्भातील निकाल देताना न्या संदेश पाटील यांनी जनी निंद्य ते सर्व सोडोनी द्यावे, जनी वंद्य ते सर्व भावे करावे, हा समर्थ रामदास स्वामींचा 'मनाचे श्लोक'मधील एक श्लोक म्हणून दाखवला होता.
























