'मी शाहरुखपेक्षा जास्त संघर्ष केला... ' कंगना रनौतने किंग खानशी केली तुलना, म्हणाली- मी गावातून आले ते दिल्लीचे..
लोकांना कदाचित माझं म्हणणं मान्य नसेल, पण मला वाटतं मी स्वतःशी आणि लोकांशी नेहमी प्रामाणिक राहिलेय. असही ती म्हणालीय

Kangna Ranaut: बॉलीवूडची क्वीन म्हणून ओळखली जाणारी कंगना रणौत (Kangana Ranaut) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण यावेळी तिनं थेट शाहरुख खानशी (Shahrukh Khan) स्वतःची तुलना केली आहे. कंगना अनेकदा स्वतःला ‘लेडी खान’ म्हणते आणि तिनं आधीपासूनच शाहरुख, सलमान, आमिर तीनही खानसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. पण यावेळी तिनं जी तुलना केलीय, त्यामुळे तिचे चाहतेही थक्क झाले आहेत. दिल्लीतील PHDCCI च्या कार्यक्रमात बोलताना तिनं सांगितलं की तिचा संघर्ष शाहरुख खानपेक्षा खूप कठीण होता. (Bollywood News)
'मी शाहरुखपेक्षा जास्त संघर्ष केला... '
कंगना रणौतचं म्हणणं आहे की तिनं शाहरुख खानपेक्षा जास्त मेहनत करून आपलं स्थान मिळवलं आहे. दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना कंगनानं सांगितलं की, “मी एका छोट्या गावातून मुंबईत आले आणि आज या पातळीवर पोहोचले. शाहरुख खान दिल्लीचा आहे, कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेला आहे. पण मी हिमाचलमधल्या भांबला नावाच्या गावातून आलेय ज्याचं नावही फार लोकांनी ऐकलं नसेल.”
ती पुढं म्हणाली, “लोकांना कदाचित माझं म्हणणं मान्य नसेल, पण मला वाटतं मी स्वतःशी आणि लोकांशी नेहमी प्रामाणिक राहिलेय. या इंडस्ट्रीत स्थान मिळवण्यासाठी मी अफाट मेहनत घेतली आहे. गावातून येऊन मुख्य प्रवाहात इतकं यश मिळवणं हे फार थोड्यांना शक्य झालं आहे.”
कुणाच्या ओळखीने नाही, स्वतःच्या मेहनतीने मिळालं यश
कंगनानं आपल्या संघर्षाबद्दलही सांगितलं. ती लहान वयात घर सोडून मुंबईत आली होती. फक्त 19 वर्षांची असताना तिनं 'गँगस्टर' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर ‘फॅशन’, ‘तनु वेड्स मनु’, ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’ आणि ‘क्वीन’ यांसारख्या हिट चित्रपटांत काम करून तिनं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. आज कंगना रणौत चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री आहे. तिचं म्हणणं आहे की यश तिला कुणाच्या ओळखीवर नाही, तर स्वतःच्या मेहनतीवर मिळालं आहे. शाहरुख खानसोबतच्या तिच्या तुलनेनं पुन्हा एकदा सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
दुसरीकडे, शाहरुख खानचा जन्म आणि शिक्षण दिल्लीमध्ये झालं. त्यांचे वडील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या कँटीनमध्ये काम करत असत. शाहरुखनं आपल्या अभिनयाची सुरुवात टीव्ही सिरियलमधून केली आणि नंतर 1991मध्ये मुंबईत येऊन चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं. आज ते भारतीय सिनेमातील सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक आहेत.
कंगना शाहरुखचे आगामी प्रोजेक्ट कोणते?
कंगनाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, कंगना रणौतचा शेवटचा चित्रपट ‘इमर्जन्सी’ बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. आता ती ‘Blessed Be the Evil’ या हॉरर-ड्रामा चित्रपटातून हॉलिवूड डेब्यू करणार आहे, जो पुढच्या वर्षी प्रदर्शित होईल. तर शाहरुख खान आपल्या मुलगी सुहाना खानसोबत सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘King’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षाच्या शेवटी प्रदर्शित होणार असून, यात राघव जुयाल, अभिषेक बच्चन आणि दीपिका पदुकोण यांच्याही भूमिका आहेत.























