देशातील महत्त्वाच्या खासगी बँकची विक्री, आशियातील मोठी डील? आखाती भारतीयांना होणार फायदा
जगभरातील नावाजलेल्या दोन बँकांमधील ही गुंतवणूक मुख्यतः प्रेफरेंशियल अलॉटमेंटद्वारे केली जाईल, ज्यात शेअर्स आणि वॉरंटचा समावेश असेल.

भारतातील बँकिंग (Banking) क्षेत्रात नावाजलेली आणि कॉर्पोरेट वर्ल्डमधील मोठी उलाढाल असलेली खासगी बँक आता विकली जाणार आहे. संयुक्त अरब अमिरातकडून भारताती आरबीएल (RBL) बँकेची खरेदी केली जाणार असल्याचे वृत्त आहे. युएईमधील दुसरी सर्वात मोठी बँक असलेल्या एमिरेट्स एनबीडी बँक पीजेएससीद्वारे ही खरेदीची मोठी डील होत आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सनुसार आरबीएल बँकची विक्री तब्बल 15 हजार कोटी रुपयांना विकली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ही किंमत 1.7 अब्ज डॉलर एवढी आहे. बँकिंग क्षेत्रातील ही डील अंतिम झाल्यास एमिरेट्स एनबीडी बँक पीजेएससी ही बँक आरबीएल बँकेत सर्वात मोठा भागधारक बनणार आहे.
जगभरातील नावाजलेल्या दोन बँकांमधील ही गुंतवणूक मुख्यतः प्रेफरेंशियल अलॉटमेंटद्वारे केली जाईल, ज्यात शेअर्स आणि वॉरंटचा समावेश असेल. त्यानंतर, अतिरिक्त 26% शेअर्ससाठी ओपन ऑफर आणली जाईल, ज्यामुळे एमिरेट्स एनबीडीचा एकूण हिस्सा 51% पर्यंत वाढेल. RBL बँकेची बोर्ड मीटिंग 18 ऑक्टोबरला होणार असून, त्यात या तिमाहीच्या निकालांवर चर्चा केली जाईल. या भेटीतच या गुंतवणुकीबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आरबीएल बँकेचं सध्याचं मार्केट कॅपिटल 17,786.8 कोटी एवढं आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकतेच बँकेच्या नियंत्रणावरील सिद्धांतिक नियमात बदल करण्यास आणि गुंतवणुकीसंदर्भात मंजुरी दिली आहे. एमिरेट्स एनबीडी आणि आरबीएल बँकेतील या व्यवहारामुळे संयुक्त अमिरातमधील एमिरेट्स एनबीडी बँकेची आशियात एन्ट्री होईल. तसेच, भारत आणि पश्चिम आशियात वेगाने वाढ होत असलेल्या रेमिटेंस म्हणजेच पैसे पाठविण्यासंदर्भातील बाजारात आपली पकड मजबूत करण्याची मोठी संधी ठरू शकेल. दरम्यान, अनिवासीय भारतीयांपैकी अंदाजे अर्धे नागरिक, मोठ्या संख्येने भारतीय आखाती देशांमध्ये राहतात, त्यांना या बँकिंग डीलचा मोठा फायदा मिळणार आहे. 2024 च्या आकडेवारीनुसार आखाती देशांमधून भारतात पाठविण्यात आलेले 38.7 अब्ज डॉलर्सच्या रेमिटेंसचा अर्धा हिस्सा एकट्या युएईमधून आला आहे.
























