PM Modi : पंतप्रधान मोदी यांच्या गुजरात दौऱ्याचा आज दुसरा दिवस, वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार
PM Modi : पंतप्रधान आज स्वदेशी हाय-स्पीड वंदे भारत एक्सप्रेसच्या नवीन आणि अपग्रेड आवृत्तीला हिरवा झेंडा दाखवतील.
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी गुजरातची (PM Modi Gujarat Visit) राजधानी गांधीनगर आणि मुंबई सेंट्रल दरम्यान चालणाऱ्या स्वदेशी हाय-स्पीड वंदे भारत एक्सप्रेसच्या (Vande Bharat Express) नवीन आणि अपग्रेड आवृत्तीला हिरवा झेंडा दाखवतील. यामुळे मेक इन इंडिया मोहिमेला बळ देण्यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले आहेत आणि वंदे भारत ट्रेनचे यश हे त्यापैकीच एक आहे. 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी घोषणा केली की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या 75 आठवड्यांच्या कालावधीत देशाच्या कानाकोपऱ्यात 75 वंदे भारत एक्सप्रेस गाड्या चालवल्या जातील.
गुजरात दौऱ्याला सुरतपासून सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी गुरुवारी त्यांचे खूप व्यस्त वेळापत्रक होते. पंतप्रधानांच्या या गुजरात दौऱ्याला सुरतपासून सुरुवात झाली. सुरत व्यतिरिक्त भावनगर आणि अहमदाबाद येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला. अहमदाबाद येथील 36 व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटनही केले.
वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक जाहीर
वंदे भारतची तिसरी ट्रेन सुरू होण्याच्या एक दिवस आधी, रेल्वे मंत्रालयाने त्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही वंदे भारत ट्रेन आठवड्यातून 6 दिवस अहमदाबाद ते मुंबई धावेल. ही ट्रेन मुंबई सेंट्रल येथून सकाळी 6.10 वाजता सुटेल आणि 12.10 ला गांधीनगरला पोहोचेल. दुसरीकडे, गांधीनगर येथून दुपारी 2.05 वाजता सुटेल आणि मुंबई सेंट्रलला 8.35 वाजता पोहोचेल. मुंबई ते अहमदाबाद प्रवास पूर्ण करण्यासाठी ट्रेनला 5.25 तास लागतील, तर ट्रेनला गांधीनगरला पोहोचण्यासाठी 6.20 तास लागतील.
160 किमी प्रतितास वेगाने धावणार
वंदे भारत एक्सप्रेस वेग, सुरक्षितता आणि सेवेसाठी ओळखली जाते. वंदे भारत एक्सप्रेस जास्तीत जास्त 160 किमी प्रतितास वेगाने धावू शकते आणि त्यात शताब्दी गाड्यांसारखे प्रवासी वर्ग आहेत, जे प्रवाशांना चांगली सेवा देतात. पूर्वीपेक्षा कमी वेळात ते लोकांना त्यांच्या गंतव्यस्थानावर घेऊन जाते. याशिवाय सर्व डब्यांना स्वयंचलित दरवाजे, GPS आधारित ऑडिओ-व्हिज्युअल प्रवासी माहिती प्रणाली, मनोरंजनाच्या उद्देशाने ऑनबोर्ड हॉटस्पॉट वाय-फाय आणि अतिशय आरामदायी बसण्याची जागा आहे. एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये फिरत्या खुर्च्या आणि बायो-व्हॅक्युम टॉयलेटही आहेत.
वंदे भारत गाड्या कोणत्या मार्गावर धावतात?
देशातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारत एक्सप्रेस सध्या नवी दिल्ली-श्री वैष्णो देवी माता, कटरा आणि नवी दिल्ली-वाराणसी या दोन मार्गांदरम्यान धावत आहे. गांधीनगर राजधानी ते मुंबई दरम्यान सुरू होणारी नवीन वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील तिसरी वंदे भारत ट्रेन आहे. या वर्षाच्या सुरुवातीला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खजुराहो येथून वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याची घोषणा केली होती. लवकरच या गाड्या देशभरात धावणार आहेत.