Vande Bharat Express: भारताची सेमी हाय स्पीड ट्रेन सुस्साट; 'वंदे भारत'ने मोडले जुने विक्रम, व्हिडिओ व्हायरल
Vande Bharat Express : मेक इन इंडिया अंतर्गत तयार करण्यात आलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसने विक्रम रचला आहे. या ट्रेनने 180 किमी प्रति तास इतका वेग गाठला.
Vande Bharat Express : भारताची पहिली हाय स्पीड ट्रेन वंदे भारतने आपल्या चाचणीत नवा विक्रम रचला आहे. चाचणीमध्ये वंदे भारत ट्रेनने 180 किमी प्रति तास इतका वेग गाठला. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत ट्रेनच्या चाचणीचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला. ही नवी 'वंदे भारत' मुंबई-अहमदाबाद मार्गावर चालवण्यात येण्याची शक्यता आहे.
वंदे भारत ट्रेनही पूर्णपणे भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन आहे. वंदे भारतमध्ये वेगळे इंजिन जोडण्यात आलेले नाही. वंदे भारतची चाचणी आरडीएसओच्या पथकाच्या देखरेखीत झाली. वंदे भारत ट्रेनने 16 कोचसह 180 किमी प्रति तास इतका वेग गाठला.
रेल्वे मंत्र्यांनी ट्वीट करत म्हटले की, वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी कोटा-नागदा मार्गावर करण्यात आली. वंदे भारत ट्रेनने 180 किमी प्रति तास इतका वेग गाठला. मात्र, यावेळी कोचमध्ये असलेल्या पाण्याने भरलेल्या जागेतून पाणीही सांडले नाही.
आत्मनिर्भर भारत की रफ़्तार… #VandeBharat-2 at 180 kmph. pic.twitter.com/1tiHyEaAMj
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) August 26, 2022
Superior ride quality.
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) August 26, 2022
Look at the glass. Stable at 180 kmph speed.#VandeBharat-2 pic.twitter.com/uYdHhCrDpy
कोटा विभागात वंदे भारत एक्स्प्रेसच्या अनेक चाचण्या पार पडल्या आहेत. या ट्रेनची पहिली चाचणी कोटा आणि घाट का बरना, दुसरी चाचणी घाट का बरना आणि कोटा दरम्यान पार पडली. त्याशिवाय तिसरी चाचणी कुर्लासी आणि रामगंज मंडी दरम्यान झाली. चौथी आणि पाचवी चाचणी कुर्लासी ते रामगंज मंडी आणि सहावी चाचणी कुर्लासी ते रामगंज मंडी दरम्यान पार पडली आहे.
वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये स्वयंचलित दरवाजे असून वातानुकूलित कार कोच आहेत. या ट्रेनमधील खुर्ची 180 अंशात फिरवता येऊ शकते. त्याशिवाय जीपीएस आधारीत माहिती यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे, व्हॅक्यूम आधारीत बायो टॉयलेटदेखील आहेत.
रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 74 वंदे भारत ट्रेन तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. दरमहा दोन ते तीन वंदे भारत एक्स्प्रेस तयार केल्या जात आहेत. काही कालावधीनंतर ही संख्या दरमहा 6 ते 7 वर आणण्यात येणार आहे. पुढील वर्षापर्यंत 75 हून अधिक वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन तयार करण्यात येणार आहे. याआधी वंदे भारत एक्स्प्रेस नवी दिल्ली ते श्री माता वैष्णोदेवी कतरा आणि नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवण्यात येत आहे.