Teesta Setalvad Remand : सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
Teesta Setalvad Remand : तिस्ता सेटलवाड (Teesta setalvad) आणि माजी आयपीएस आरबी श्रीकुमार यांना 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
Teesta Setalvad Remand : सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड (Teesta setalvad) आणि माजी आयपीएस आरबी श्रीकुमार यांना 2 जुलैपर्यंत गुजरात पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. गुजरातच्या अहमदाबाद क्राइम ब्रँचने दोघांनाही 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना 2 जुलैपर्यंत कोठडी दिली आहे. अहमदाबाद येथील घिकाटा येथील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी क्रमांक 11 यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली.
शनिवारी सेटलवाड यांना गुजरात एटीएसच्या पथकाने त्यांच्या मुंबईतील घरातून ताब्यात घेतले होते. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, अहमदाबाद क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्याने सेटलवाड यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.
तिस्ता सेटलवाड यांना ताब्यात घेतल्यानंतर प्रथम मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर गुजरात पोलिसांचे एक पथक त्यांना अहमदाबादला घेऊन गेले. रविवारी तिस्ता सेटलवाड यांना वैद्यकीय उपचारासाठी अहमदाबाद येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे त्यांनी पत्रकारांना सांगितले की, त्यांच्या हाताला दुखापत झाली असून त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे.
गुजरात दंगलीप्रकरणी खोटी माहिती दिल्याबद्दल तिस्ता सेटलवाड यांना गुजरात एटीएसने काल अटक केली होती. अहमदाबाद गुन्हे शाखेने माजी आयपीएस अधिकारी आरबी श्रीकुमार यांना देखील अटक केली आहे. रविवारी दोघांनाही न्यायालयात हजर केले केले. त्यानंतर न्यायालयाने आज दोघांनी 2 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
गुजरात दंगलीवरील एसआयटीच्या अहवालाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने 24 जून रोजी फेटाळून लावली होती. झाकिया जाफरी यांनी ही याचिका दाखल केली होती. याचिका फेटाळताना सुप्रीम कोर्टाने म्हटले की, तीस्ता सेटलवाड यांची अधिक चौकशी करण्याची गरज आहे, कारण तीस्ता या प्रकरणात झाकिया जाफरी यांच्या भावनांचा स्वतःच्या फायद्यासाठी छुप्या पद्धतीने वापर करत होत्या.
2002 च्या गुजरात दंगलीमध्ये झाकिया जाफरी यांचे पती एहसान जाफरी यांची जमावाने हत्या केली होती. एहसान जाफरी यांची पत्नी झाकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून एसआयटीच्या अहवालाला आव्हान दिले आहे.
एसआयटीच्या अहवालात राज्यात मोठ्या पदावर असलेल्या लोकांना क्लीन चिट देण्यात आली होती. एसआयटीने गोध्रा ट्रेन आगीची घटना आणि त्यानंतर उसळलेल्या दंगलीला भडकावण्याचा राज्यातील उच्च अधिकार्यांचा कट असण्याची शक्यता नाकारली होती. 2017 मध्ये गुजरात हायकोर्टाने एसआयटीच्या क्लोजर रिपोर्टविरुद्ध झाकिया यांनी तक्रार फेटाळली होती.