Taj Mahal PIL: ताज महालातील 22 खोल्यांचा वाद; हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना झापले, म्हटले...
Taj Mahal PIL: ताज महालमधील बंद 22 खोल्या उघडण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने याचिकाकर्त्याला झापले. तुम्ही ताज महालचा अभ्यास करून या अशा स्पष्ट शब्दात हायकोर्टाने खडेबोल सुनावले.
Taj Mahal PIL: उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील सुप्रसिद्ध ताज महालमधील 22 खोल्या उघडण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठासमोर सुनावणी झाली. हायकोर्टाने यावेळी याचिकाकर्त्यांना चांगलच झापले. आज तु्म्ही ताज महालमधील 22 खोल्या पाहण्यासाठी याचिका दाखल केली आहे. उद्या न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये जाण्याची परवानगी मागाल असे म्हणत हायकोर्टाने फटकारले.
ताज महालमधील 22 खोल्या उघडल्या जाव्यात आणि आर्कियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (ASI) कडून त्याची तपासणी करण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. या याचिकेवर न्या. डी. के. उपाध्याय आणि न्या. सुभाष विद्यार्थी यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. याचिकार्त्यांच्या वकीलांनी सांगितले की, देशातील नागरिकांना ताज महालबाबत सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. आम्ही माहितीच्या अधिकारातंर्गत माहिती मागितली. मात्र, ती माहिती देण्यात आली नाही. ताज महालमध्ये एखादी वस्तू लपवण्यात आली असेल तर त्याची माहिती नागरिकांना द्यायला हवी. ताज महालची जमीन कोणाची आहे, हा आमचा मुद्दा नसून या बंद खोलीत काय आहे, हे जाणून घ्यायचं असल्याचं याचिकाकर्त्याने म्हटले.
उत्तर प्रदेश सरकारच्या वकिलांनी बाजू मांडताना म्हटले की, या प्रकरणी आग्रामध्ये आधीच खटला दाखल आहे. त्याशिवाय याचिकाकर्त्याच्या अधिकार क्षेत्रात हा भाग येत नाही.
हायकोर्टाने याचिकाकर्त्याला झापले
हायकोर्टाने याचिकाकर्त्याला चांगलेच फटकारले. तु्म्ही आधी एमए करा, त्यानंतर नेट परीक्षा उत्तीर्ण करून जेआरएफसाठी पात्र होऊन या विषयावर संशोधन करावे. एखाद्या विद्यापीठाने तुम्हाला संशोधन करण्यापासून रोखल्यास कोर्टात दाद मागवी असेही खंडपीठाने याचिकाकर्त्याला सुनावले. ताज महाल कोणी बनवला याची माहिती तुम्हाला नाही का, ताज महालचे वय काय, ते कोणी बनवले याची माहिती देण्यासाठी आम्ही येथे बसलो आहोत का, असा सवालही हायकोर्टाने केला. जनहित याचिका दाखल करण्याच्या प्रक्रियेला हास्यास्पद करू नका असेही कोर्टाने म्हटले.
पांढऱ्या शुभ्र संगमरवरी ताज महालाचा इतिहास
जगातील सात आश्चर्यापैकी ताज महाल एक समजला जातो. पांढऱ्या शुभ्र संगमरवरानं बांधलेली यमुनेच्या किनाऱ्यावर वसलेली ही वास्तू पाहताच क्षणी मनात घर करते. देश-विदेशातून अनेक पर्यटक ताज महालाचं सौंदर्य पाहण्यासाठी येत असतात. ताज महालाला प्रेमाचं प्रतिक मानलं जातं. मुघल बादशाह शाहजहान यांचं आपली पत्नी मुमताजवर प्रेम होतं. तिच्या निधनानंतर तिची आठवण म्हणून शाहजहान यांनी ताज महाल बांधला. ही संगमरवरी इमारत उभारण्यास तब्बल 21 वर्षांचा अवधी लागला होता.