(Source: ECI/ABP News/ABP Majha)
INS Virat चं संग्रहालय बनवण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, तोडकामावरील बंदी हटवली
सरन्यायाधीश म्हणाले की, देशभक्तीचा जोपर्यंत संबंध आहे तोपर्यंत आम्ही आपल्याशी सहमत आहोत. पण कोणीतरी पैसे देऊन हे जहाज विकत घेतले आहे. हे जहाज आता 40 टक्के तोडण्यात आलं आहे. त्यामुळे आता ही प्रक्रिया थांबवता येणार नाही.
नवी दिल्ली : नौदलाच्या सेवेतून निवृत्त झालेले विमानवाहक जहाज आयएनएस विराट (INS Virat) तोडकामावर लावण्यात आलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने आज उठवली आहे. 10 फेब्रुवारी रोजी एका कंपनीने दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने जहाज तोडण्यास स्थगिती दिली होती. एक कंपनी आयएनएस विराटला विकत घेऊन त्याचे संग्रहात रुपांतर करणार होती. जेणेकरुन लोकांना या जहाजाची कामगिरी आणि योगदान कळेल.
सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आज सांगितले की, याचिकाकर्त्याने कोर्टाचा दरवाजा ठोठावण्यात बराच उशीर केला आहे. जहाजाचं 40 टक्के तोडकाम झालं आहे. कोर्टाने असेही म्हटले आहे की, मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यास संरक्षण मंत्रालयाकडे निवेदन सादर करण्यास सांगितले होते. परंतु सरकारने ती मागणी मान्य केली नाही. याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यात आता हस्तक्षेप करणे योग्य ठरणार नाही.
याचिकाकर्त्याने जहाजाचे ऐतिहासिक महत्त्व मांडले. जर जहाजाचे संग्रहालय बनवले गेले तर भविष्यात ज्यांना ते पहायला मिळेल त्यांच्यात देशप्रेमाची भावना जागवेल. यावर सरन्यायाधीश म्हणाले की, देशभक्तीचा जोपर्यंत संबंध आहे तोपर्यंत आम्ही आपल्याशी सहमत आहोत. पण कोणीतरी पैसे देऊन हे जहाज विकत घेतले आहे. हे जहाज आता 40 टक्के तोडण्यात आलं आहे. त्यामुळे आता ही प्रक्रिया थांबवता येणार नाही.
शक्तिशाली युद्धनौका 'विराट' आज निवृत्त
भारताच्या नाविक सामर्थ्याचे प्रतिक बनलेली आयएनएस विराट 1987 साली भारतीय नौदलात दाखल झाली होती. तत्पूर्वी 27 वर्षे ती ‘एचएमएस हरमीस’ या नावाने ब्रिटिश नौदलाच्या ताफ्यात कार्यरत होती. भारतानं 1987 साली ब्रिटनकडून ही युद्धनौका खरेदी केली होती. जवळपास 3 दशकांच्या सेवेनंतर हे जहाज 6 मार्च 2017 रोजी नौदलातून निवृत्त करण्यात आलं. भावनगरच्या श्रीराम ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजने ते विकत घेतले. 28 सप्टेंबर 2020 रोजी ते गुजरातमधील अलंग बंदरात आणले गेले.
जवळजवळ 24 हजार टन वजनाच्या 'विराट'ची लांबी 740 फूट आणि रुंदी 160 फूट एवढी होती. यावर तब्बल 1500 नौसैनिक कायम तैनात असत. विराटवर एकावेळी तीन महिने पुरेल एवढं खाद्या सामुग्री असत. कारण की, विराट एकदा समुद्रात गेल्यावर 90 दिवसांपर्यंत दुसऱ्या बंदरावर जात नसे. यावर तैनात असणारे सी-हॅरिअर लढाऊ विमान आणि सीकिंग हेलिकॉप्टर हे विराटची ताकद कैकपटीनं वाढवायचे. या युद्धनौकांवर मिग, सुखोई, मिराज इत्यादी लढाऊ विमानं असत.