एक्स्प्लोर
मुलीची हत्या करुन मृतदेह कपाटात, सावत्र आईला अटक
उत्तराखंडची राजधानी डेहरादूनमध्ये एका सावत्र आईने आपल्या मुलीची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे घरातील कपाटातच ठेवल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

डेहरादून : उत्तराखंडची राजधानी डेहरादूनमध्ये एका सावत्र आईने आपल्या मुलीची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे घरातील कपाटातच ठेवल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याआधी तिने आपली मुलगी हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. डेहरादूनच्या कोतवाली परिसरात राहणारी मीनू आहूजा हिने काही दिवसांपूर्वीच आपली सावत्र मुलगी प्राप्ती हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. आपण मुलीला दिल्लीला सोडल्यानंतर आपला तिच्याशी संपर्कच झालेला नाही. असं तिने दिलेल्या तक्रारीत म्हटलं होतं. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ मुलीचा तपास सुरु केला. यावेळी पोलिसांनी मीनू आहूजा हिचीदेखील चौकशी केली. चौकशीदरम्यान, मीनू प्रचंड घाबरल्याचं पोलिसांना लक्षात आलं. त्यामुळे पोलिसांचा तिच्यावरील संशय बळावला. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर आपणच प्राप्तीची हत्या केल्याचं मान्य करत मीनूनं आपला गुन्हा कबूल केला. मिळालेल्या माहितीनुसार, मीनूने सुरवातीला मुलीच्या डोक्यावर जड वस्तूने प्रहार केला आणि त्यानंतर तिचे दोन तुकडे करुन ते घरातीलच कपाटात भरुन ठेवले. पोलिसांनी प्राप्तीचा मृतदेह ताब्यात घेतला असून मीनूला देखील अटक केली आहे. दरम्यान, या हत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
आणखी वाचा























