CBI Arrests Sanjay Pandey: ईडीनंतर सीबीआयने संजय पांडे यांना केली अटक, चार दिवसांची कोठडी
CBI Arrests Sanjay Pandey: ईडीनंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना आता एनएसई को लोकेशन आणि फोन टॅपिंग प्रकरणात सीबीआयने अटक केली आहे.
CBI Arrests Sanjay Pandey: ईडीनंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना आता एनएसई को लोकेशन आणि फोन टॅपिंग प्रकरणात सीबीआयने अटक केली आहे. दिल्ली न्यायालयाने संजय पांडे यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवले आहे. सीबीआयकडे तपास सुरू ठेवण्यासाठी पुरेसे कारण असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे सीईओ आणि माजी संचालक रवी नारायण यांनाही याच प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
14 जुलै रोजी दाखल करण्यात आला होता गुन्हा
दिल्ली न्यायालयाने संजय पांडे यांना चार दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. सीबीआयकडे तपास सुरू ठेवण्यासाठी पुरेसे कारण असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. 14 जुलै रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण आणि मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्यावर पीएमएल अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीबीआयने यापूर्वी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
पांडे आधीपासूनच न्यायालयीन कोठडीत
अंमलबजावणी संचालनालयाने दखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात मंगळवारी संजय पांडेला 16 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. याच प्रकरणात गुरुवारी दिल्ली न्यायालयाने संजय पांडे यांना जामीन नाकारला होता. विशेष न्यायाधीश सुनेना शर्मा यांनी संजय पांडे यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.
याप्रकरणी सीबीआयने टाकले होते छापे
तत्पूर्वी, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूचनेनुसार तपास यंत्रणेने या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याआधी सीबीआयने मुंबईतील सीबीआय मुख्यालयात पांडे यांचा जबाब नोंदवला होता. चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. यानंतर सीबीआयने या प्रकरणासंदर्भात मुंबई, पुणे आणि देशातील अनेक ठिकाणी छापे टाकले होते.
काय आहे प्रकरण?
दरम्यान, संजय पांडे यांनी 2001 मध्ये पोलीस सेवेचा राजीनामा दिला होता. मात्र त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही. त्यानंतर त्यांनी आयटी कंपनी सुरू केली होती. मात्र काही काळानंतर ते पुन्हा पोलिस सेवेत रुजू झाले. त्याच वेळी त्यांच्या मुलाला कंपनीचे संचालक बनवण्यात आले. 2010 ते 2015 दरम्यान, Isaac Services Pvt Ltd कंपनीला एनसीई सर्व्हर आणि सिस्टम सिक्युरिटीसाठी कंत्राट देण्यात आले होते. एनएसई घोटाळ्यात फोन टॅपिंगसाठी वापरण्यात आलेले फोन टॅपिंग मशिन हे संजय पांडे यांच्या आयटी कंपनीने इस्राएलमधून मागवले असल्याचा आरोप आहे. या मशिनच्या माध्यमातून एनएसईचे अधिकारी कर्मचाऱ्यांचे फोन टॅपिंग करत होते. फोन टॅपिंगच्या माध्यमातून इत्यंभूत गोपनीय माहिती ही या प्रकरणातील मुख्य आरोपी माजी एनएसई प्रमुख चित्रा रामकृष्णन यांना दिली जात होती. यासाठी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाला असल्याचे महत्त्वाचे पुरावे सीबीआय आणि ईडीला मिळाले आहेत. याचप्रकारणी ही कारवाई सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.