एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रामाचं कार्य होणारच, सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक वक्तव्य
लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर शपथविधी होण्यापूर्वीच संघाने पुन्हा एकदा रामनामाचा जप सुरु केला आहे. रामाचं कार्य होणारच, असं सूचक वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवतांनी उदयपूरमध्ये केलं
उदयपूर : केंद्रात भाजपला स्वबळावर सत्ता मिळाल्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राम मंदिर पूर्ण होण्याची आशा आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी तशा प्रकारचे संकेत दिले आहेत. रामाचं कार्य सगळ्यांनी मिळून करायचं आहे आणि ते होणारच, असा विश्वास भागवतांनी उदयपूरमध्ये आयोजित रामकथा कार्यक्रमात व्यक्त केला.
संघ परिवाराकडून राम मंदिराचं बांधकाम सुरु करण्याच्या मागणीसाठी निवडणुकीपूर्वी हुंकार सभा घेण्यात आल्या होत्या. केंद्र सरकारने त्यावर आता अध्यादेश काढावा, असा आग्रह भागवतांनी केला होता. आता निवडणुका झाल्यानंतर संघाने पुन्हा एकदा रामनामाचा जप सुरु केला आहे.
भाजपने 2019 च्या जाहीरनाम्यातही न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून केंद्र सरकार राम मंदिर निर्माणासाठी आवश्यक असणारे निर्णय घेईल, असं आश्वासन दिलं आहे. वादग्रस्त जमिनीच्या आसपास जवळपास 67 एकर जमीन आहे, जिच्याबद्दल कसलाही तंटाबखेडा नाही. ती मूळ मालकांना परत करण्याची परवानगी मिळावी, अशी याचिका केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात केली होती. त्यामुळे किमान मंदिरनिर्मितीसाठी आवश्यक अशी तयारी या परिसरात नक्कीच करता येऊ शकते.
दरम्यान, अयोध्या प्रकरणाची सुनावणी तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. 15 ऑगस्टनंतर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. मध्यस्थांच्या त्रिसदस्यीय समितीनं सीलबंद अहवाल सुप्रीम कोर्टात सादर केल्यानंतर कोर्टाने हा निर्णय दिला होता.
याआधी, फेब्रुवारी महिन्यात झालेल्या विहिंपच्या धर्मसंसदेत मोहन भागवतांनी राम मंदिरावर बोलणं टाळलं होतं. तर गेल्या वर्षी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका विराट हिंदू सभेमध्ये, राम मंदिराच्या निर्माणासाठी आता कोणतीही तडजोड चालणार नाही, असा आक्रमक पवित्रा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी घेतला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement