लाल किल्ला हिंसाचार: दिल्ली पोलिसांकडून 45 दंगेखोरांची छायाचित्रे प्रसिद्ध, मास्टरमाइंड अजूनही फरार
Red Fort Violence: दिल्लीतील लाल किल्ल्यावरील हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी आता आणखी 45 दंगेखोरांची छायाचित्रे जाहीर केली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सुमारे दीडशे लोकांना अटक केली आहे.
नवी दिल्ली : दिल्लीत 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी शेतकरी ट्रॅक्टर रॅली दरम्यान लाल किल्ल्यावरील झालेल्या हिंसाचार प्रकरणात सहभागी असलेल्या 45 लोकांची छायाचित्रे दिल्ली पोलिसांनी जाहीर केली आहेत. हे सर्वजण सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये हिंसाचार करताना दिसले आहेत. मात्र, हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार दीप सिद्धू अद्याप फरार आहे.
150 जणांना अटक, 44 एफआयआरची नोंद व्हिडिओ तपासल्यानंतर पोलिसांनी तज्ञांच्या मदतीने ही छायाचित्रे काढली आणि प्रसिद्ध केली. यापूर्वी गुन्हे शाखेने 12 दंगेखोरांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. या हिंसाचाराबद्दल दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 44 एफआयआर नोंदविल्या आहेत, त्यामध्ये सुमारे दीडशे जणांची अटकही करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे पोहोचल्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत दोघांना अटक केली आहे.
दिल्ली पोलिसांचे विशेष तपास पथक सीसीटीव्ही कॅमेरे, व्हायरल व्हिडिओ, मीडिया कॅमेरे, दिल्ली पोलिसांचे कॅमेरे आणि जनतेच्या आवाहनानंतर पोलिसांना मिळालेल्या सुमारे पाच हजार व्हिडिओंची चौकशी करीत आहे. या तपासानंतर पोलिसांनी या दंगेखोरांना ओळखले. आतापर्यंत त्यांनी 8 दंगेखोरांची माहिती देणाऱ्यांना बक्षीस जाहीर केले आहे,
दीप सिद्धू कुठे आहे? हिंसाचार संदर्भात गुन्हे शाखेचा तपास अत्यंत सावकाश सुरू आहे. प्रकरण ताब्यात घेतल्यानंतर एसआयटीने आतापर्यंत केवळ दोन लोकांना अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दीप सिद्धूच्या शोधात पोलिस हरियाणा आणि पंजाबमध्ये तळ ठोकून आहेत. अनेक ठिकाणी छापे टाकूनही पोलिसांना यश मिळत नाही.
दीप सिद्धू सतत आपले व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करुन स्पष्टीकरण देत आहेत आणि दिल्ली पोलिसांना आव्हान देत आहे. मात्र, प्रत्येकवेळी तो पोलिसांपेक्षा दोन पाऊल पुढे आहे. यामुळेच पोलिसांनी आता जनतेची मदत मागितली असून दीप सिद्धू याच्यासह चार जणांची माहिती देणाऱ्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.