कोल्हापुरातील शहाजी विधी महाविद्यालयात "कायद्याचा दवाखाना"; अभिनव संकल्पना, कसे असणार कामकाज?
याबाबत माहिती देताना प्राचार्य डाॅ. प्रवीण पाटील म्हणाले की, आरोग्य सेवेच्या धरतीवरअशी ही संकल्पना आहे.

कोल्हापूर : शहरातील (Kolhapur) शहाजी विधी महाविद्यालयात "कायद्याचा दवाखाना" या अभिनव संकल्पनेचे उद्घाटन झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण पाटील यांच्या कल्पनेतून ही अभिनव संकल्पना अस्तित्वात आली. कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना या कायद्याच्या दवाखान्यातून मोफत कायदेविषयक सल्ला, मार्गदर्शन व समुपदेशन मिळणार आहे. उद्घाटनपर भाषणात प्रमुख पाहुण्या कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा रजनीताई मगदूम म्हणाल्या, या कायद्याच्या दवाखान्याच्या माध्यमातून घराघरातील असणारे छोटे-मोठे वादविवाद, तंटे पूर्णपणे मिटतील. समाजामध्ये सलोखा आणि शांतता नांदावी या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून शहाजी विधी महाविद्यालयाने (College) उचललेले हे पाऊल कौतुकास्पद आहे, असेही त्या म्हणाल्या.
याबाबत माहिती देताना प्राचार्य डाॅ. प्रवीण पाटील म्हणाले की, आरोग्य सेवेच्या धरतीवरअशी ही संकल्पना आहे. विविध आरोग्य शिबिरामार्फत वेगवेगळ्या आजारांवर उपचार व प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले जाते, त्याचप्रमाणे समाजातील विविध वाद, तंटे -बखेडे व न्यायालयीन प्रकरणांबाबत कायद्याच्या दवाखान्यातून मोफत सल्ला, मार्गदर्शन व समुपदेशन मिळेल. घराघरांतील असणारे वादविवाद, तंटे या मोफत कायदा सहाय्य दवाखान्याच्या माध्यमातून मिटावेत आणि लोकांपर्यंत ही अभिनव संकल्पना पोहोचावी, या उद्देशाने हा अभिनव उपक्रम सुरू करण्याची योजना महाविद्यालयाने सुरू केली. कोल्हापूर शहरातील चौकाचौकात फिरता कायद्याचा दवाखाना स्थापन करून लोकांना विविध कायदेशीर तरतुदींचे मार्गदर्शनपर माहिती आणि त्यांचे समुपदेशन केले जाणार आहे. विनामूल्य सल्ला व कायद्याशी संबंधित कोणत्याही प्रश्नांचे निशुल्क मार्गदर्शन केले जाईल. महिला, जेष्ठ, दिव्यांग व गरजू नागरिकांना विशेष मदत करण्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, यावेळी कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, सचिव ॲड. वैभव पेडणेकर, सचिव ॲड. अमित बाडकर आदी प्रमुख उपस्थित होते .
असा आहे कायद्याचा दवाखाना
आरोग्य शिबिराच्या धरतीवर असणार कायद्याच्या दवाखान्याचे कामकाज
कायद्याच्या दवाखान्यातून होणार प्राथमिक स्वरूपाचे समुपदेशन. छोट्या-मोठ्या वादविवाद व तंटे बखेड्यांवर जाग्यावरच पर्याय सांगितला जाईल.
गंभीर व अतिगंभीर स्वरूपांच्या प्रकरणांवर कोल्हापूर जिल्हा मोफत विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून मोफत सल्ला व मार्गदर्शन.
न्यायालयीन कायदेशीर अधिकारांबाबत मिळणार मार्गदर्शन व समुपदेशन.
पहिले अडीच ते तीन महिने हा कायद्याचा दवाखाना संपूर्ण कोल्हापूर शहरभर फिरता असेल. त्यानंतर जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय ठीकठिकाणी हा फिरता दवाखाना पोहोचेल.
हेही वाचा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

