फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष मोदींना चोर म्हणाले, राहुल गांधींचा आरोप
फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष म्हणतात पंतप्रधान मोदी चोर आहेत. राफेल डीलप्रकरणी राहुल गांधींनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. अनिल अंबानींना मोदींनी 30 हजार कोटी दिल्याचा दावावी राहुल गांधींनी केला.
नवी दिल्ली : फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी जे आरोप केले, त्यातून राफेल करारामध्ये भ्रष्टाचार झाल्याचं स्पष्ट होत आहे. याचाच अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चोरी केली आहे, हा देशाचा अपमान आहे. राफेल करारावरुन सरकारनं जनतेची, सैन्याची फसवणूक केल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला आहे.
सर्वसामान्य जनतेचा पैसा मोदींनी अनिल अंबानी यांच्या खिशात घातला. मोदींनी अंबानी यांना 30 हजार कोटी रुपयांचं गिफ्ट दिल्याचा आरोपही राहुल यांनी केला आहे. तर या घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली आहे.
फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या दाव्यानंतर राहुल यांनी आज पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला. फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष आपल्या पंतप्रधानांबद्दल असे आरोप करत असल्याने मला वाईट वाटत असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं.
भारताच्या पंतप्रधान पदाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, त्यामुळे खरं काय आहे ते मोदींनी देशाला सांगावं हेच मला सांगायचं आहे, असंही राहुल गांधी म्हणाले.
भारत सरकारकडून 'रिलायन्स डिफेन्स' हे एकच नाव आल्यामुळे देसॉ एव्हिएशनकडे दुसरा पर्यायच नव्हता, असा दावा फ्रान्स्वा ओलांद यांनी केला आहे. फ्रान्सच्या एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत ओलांद यांनी ही बाजू मांडली आहे.
यापूर्वी राफेल विमान करार हा दोन खासगी कंपन्यातील करार असून त्यात सरकारची कुठलिही भूमिका नाही, असं केंद्र सरकारने म्हटलं होतं. मात्र, ओलांद यांच्या दाव्यानंतर सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. संरक्षण मंत्रालयाने मात्र ओलांद यांच्या दाव्यातील तथ्य तपासून पाहत असल्याचं म्हटलं आहे.
संबंधित बातम्या
राफेल विमान करार : भारताने फक्त रिलायन्सचं नाव सुचवलं : ओलांद