Pulwama : पुलवामामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद
पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मात्र या चकमकीत भारताचा एक जवान शहीद झाला आहे
श्रीनगर : पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मात्र या चकमकीत भारताचा एक जवान शहीद झाला आहे.
सुरक्षा दलाला जैश ए मोहम्मदच्या एका कमांडरसह तीन ते चार आतंकवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने शोधमोहिम हाती घेण्यात आली होती. शोधमोहिम सुरु असताना दहशतवाद्यांनी सुरक्षाबलावर हल्ला केला. त्यानंतर जवानांनीदेखील चोख प्रत्युत्तर दिले.या चकमकीदरम्यान तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश मिळाले आहे. अजूनही काही दहशतवादी लपल्याची शंका सुरक्षा दलाला असल्याने सर्च ऑपरेशन सुरू आहे.
सीमाभागात दहशतावाद्यांच्या कुरघोड्या सुरूच असतात. मात्र भारतीय जवानांनीदेखील त्याला प्रत्युत्तर दिलं. पण या चकमकीत जवान शहीद झाला आहे. याशिवाय एक भारतीय जवान गंभीर जखमी झाला आहे. जखमी जवानावर रुग्णालयात उपचार सुरु असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. शहीद झालेल्या जवानाचे नाव हवलदार काशी राव आहे. शहीद हवलदार राव यांच्यामागे पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे.
तर दुसरीकडे दक्षिण काश्मीरच्या अनंतनागमध्ये पोलिसांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एक पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात उपचार सुरू आहे. हल्ल्यानंतर परिसरात नाकाबंदी केली असून हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.