Mumbai Transharbour Link: मुंबईतील ट्रान्स हार्बर लिंकसाठी PM मोदींकडून शुभेच्छा, पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
Mumbai Trans Harbour Link: भारतातील सर्वात लांब सागरी सेतूचे काम पूर्ण झाले असून पंतप्रधान मोदींनी यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पंतप्रधानांनी याबाबत ट्विटकरुन आनंद देखील व्यक्त केला आहे.
Mumbai Trans Harbour Link Project: मुंबईतील शिवडी आणि रायगडमधील न्हावा शेवाला जोडणाऱ्या मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (Mumbai Trans Harbour Link) प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या काही महिन्यात हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. भारतातील सर्वात लांबीच्या या सागरी पुलाच्या कामाचे पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले आहे. या प्रकल्पामुळे लोकांना मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक
मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (Mumbai Trans Harbour Link) बांधण्यासाठी आधुनिक आणि जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन या सागरी सेतूसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'या अद्ययावत पायाभूत सुविधांमुळे देशातील नागरिकांचे जीवनमान अधिक सुखकर होण्यास पाठबळ मिळेल.' उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मार्गाची गुणवैशिष्ट्ये सांगणारे ट्विट केले होते. त्याच ट्विटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिसाद देत रिट्वीट केले आहे.
Next generation infrastructure which will boost ‘Ease of Living’ for people. https://t.co/Sx3YOnryI3
— Narendra Modi (@narendramodi) May 25, 2023
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) 9 मे रोजी प्रकल्पातील शेवटच्या पोलीदी कमानीचे काम पूर्ण केले. त्यानंतर या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. या प्रकल्पाच्या अखेरच्या जोडणीचे काम देखील पूर्ण झाले आहे. या कामाची पाहणी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच नोव्हेंबर 2023 पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेसाठी तयार होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
या पारबंदर प्रकल्पामुळे मुंबई,नवी मुंबई आणि रायगड हे महत्त्वाचे भाग जोडले जातील असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच आगामी काळात तिसरी मुंबई पलीकडे उभी राहणार असल्याचा आशावाद देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. या प्रकल्पामुळे मुंबई, नवी मुंबई आणि रायगड या भागांना चांगला फायदा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्यास देखील मदत होईल. तसेच यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-गोवा महामार्ग यांना देखील सहज जोडण्यास मदत होईल.