(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ट्वीटसाठी प्रशांत भूषण माफी मागणार? न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी माफीनाम्यासाठी आज शेवटचा दिवस
सर्वोच्च न्यायालयाने ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना सुर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे. न्यायालयाने माफीनाम्यासाठी दिलेल्या मुदतीचा आज शेवटचा दिवस आहे.
नवी दिल्ली : ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. यासाठी न्यायालयाची माफी मागण्यासाठी त्यांना दिलेल्या मुदतीचा आज अखेरचा दिवस आहे. न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठासमोर पार पडलेल्या सुनावणी दरम्यान प्रशांत भूषण यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. तसेच त्यांना 24 ऑगस्टपर्यंत बिनशर्त माफी मागण्यासाठी मुदत दिली होती. प्रशांत भूषण यांनी जर आज माफीनामा सादर केला तर त्यावर उद्या म्हणजेच, 25 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
सुप्रीम कोर्टाने ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना सुर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे. याप्रकरणी जास्तीत जास्त सहा महिन्यांची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा दिल्या जाऊ शकतात. याशिवाय सर्वोच्च न्यायालय प्रतिकात्मक शिक्षाही देऊ शकतं.
काय आहे प्रकरण?
ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. 27 जून रोजी करण्यात आलेल्या एका ट्वीटमध्ये प्रशांत भूषण यांनी 4 माजी सरन्यायाधीशांना हे लोकशाहीच्या हत्येत सहभागी असल्याचे वक्तव्य केलं होतं. तसेच काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीश शरद बोबडे हे नागपूरमधील राजभवनात हार्ले डेव्हिडसन मोटारसायकलवर स्वार झाल्याचं एक छायाचित्र प्रसिद्ध झालं होते. त्यावर प्रशांत भूषण यांनी उपहासात्मक टिप्पणी केली होती. प्रशांत भूषण यांच्या ट्वीटची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस बजावली होती.
ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांचे विवादीत ट्वीट :
27 जुनचे ट्वीट
“भविष्यकाळातील इतिहासकार जेव्हा गेल्या 6 वर्षांचा आढावा घेतील, तेव्हा अधिकृतपणे आणीबाणी न लादताही लोकशाही कशी उद्ध्वस्त केली गेली हे बघताना या विध्वंसातील सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर विशेषत्वाने बोट ठेवले जाईल आणि त्यातही मागील 4 सरन्यायाधीशांच्या भूमिकेवर बोट ठेवले जाईल.” न्यायमूर्ती एस. ए बोबडे, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती जे. एस. खेहर या चार न्यायाधिशांचा नाव न घेता उल्लेख भूषण यांनी केला आहे.
29 जूनचे ट्वीट
“एकीकडे सर्वोच्च न्यायालयाला टाळे लावून नागरिकांना न्यायाचा मूलभूत हक्क नाकारला जात आहे आणि दुसरीकडे सीजेआय मास्क किंवा हेल्मेटही न घालता नागपूरच्या राजभवनात एका भाजप नेत्याच्या 50 लाख रुपये किमतीच्या मोटरसायकलवर स्वार झाले आहेत.”
याप्रकरणी आपली बाजू मांडताना प्रशांत भूषण यांनी मान्य केलं होतं की, सरन्यायाधीशांच्या फोटोवर प्रतिक्रीया व्यक्त करण्यापूर्वी त्यांनी कोणत्याही तथ्यांची तपासणी केली नव्हती. परंतु, याचसोबत ते हेदेखील म्हणाले होते की, 'माझं ट्वीट न्यायाधीशांच्या वैयक्तिक वागण्यावर होतं, यामध्ये न्यायव्यवस्थेवर बोट ठेवण्यात आलं नव्हतं. माझं मत कितीही स्पष्ट मान्य न होण्यासारखं असलं तरी न्यायालयाचा अवमान होऊ शकत नाही, असं उत्तर दिलं होतं, अशी बाजू प्रशांत भूषण मांडली होती.' त्यानंतर कोर्टाने प्रशांत भूषण यांना 14 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवलं होतं.
प्रशांत भूषण यांचा माफी मागण्यास नकार
सुप्रीम कोर्टाच्या वतीने सुनावणी पुढे ढकलण्यासाठीचा अर्ज फेटाळून लावल्यानंतर प्रशांत भूषण यांना देण्यात येणाऱ्या शिक्षेबाबत चर्चा सुरु झाली. सर्वात आधी स्वतः प्रशांत भूषण यांनी आपली बाजू मांडली. त्यांनी एक लेखी वक्तव्य वाचलं होतं. ते म्हणाले होते की, 'मला या गोष्टीचं दुःख आहे की, मला समजून घेतलं नाही. मला माझ्याबद्दल केलेल्या तक्रारीची प्रतदेखील देण्यात आली नाही. मला शिक्षेची चिंता नाही. मी घटनात्मक जबाबदारी प्रती सावध करणारं ट्वीट करुन नागरिक म्हणून आपले कर्तव्य बजावले आहे.'
प्रशांत भूषण यांनी माफी मागण्यास नकार देत महात्मा गांधी यांचं एका वक्तव्याचं उदाहरण दिलं आहे. ते म्हणाले की, 'राष्ट्रपिता महात्मा गांधी एकदा म्हणाले होते की, 'मी दयेची मागणी करणार नाही. कायद्यानुसार मला जी शिक्षा देण्यात येईल ती मला मंजूर असेल.'
महत्त्वाच्या बातम्या :
सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत भूषण दोषी; 20 ऑगस्टला शिक्षेची सुनावणी
प्रशांत भूषण यांच्यावरील कारवाई प्रकरणी बार काऊंसिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचं सरन्यायाधीशांना पत्र