एक्स्प्लोर
फक्त 50 दिवस सहन करा, काळ्या पैशावर हल्लाबोल तीव्र : मोदी
पणजी : पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळ्या पैशाविरोधातील हल्लाबोल आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. नोटांबदीच्या विषयावर मोदींनी गोव्यातून आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यावेळी फक्त पुढचे 50 दिवस त्रास सहन करण्याची विनंती पंतप्रधानांनी सर्वसामान्य नागरिकांना केली.
70 वर्ष जुना रोग
पाचशे-हजारच्या नोटा चलनातून बाद केल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्रास होईल याची आधीपासून कल्पना होती. मात्र 70 वर्ष जुना रोग मला 17 महिन्यांत संपवायचा आहे. त्यासाठी हळूहळू औषध देण्याचं काम सुरु आहे. मला 30 डिसेंबरपर्यंतचा वेळ द्या, जनतेला फक्त 50 दिवस थोडाफार त्रास सहन करावा लागेल, असं आवाहन मोदींनी केलं.
नोटा बदलीचा निर्णय 50 दिवसांनंतर चुकीचा वाटला, तर मला देशातल्या कोणत्याही चौकात कोणतीही शिक्षा द्या. मी भोगायला तयार आहे, असंही मोदी म्हणाले. 10 महिन्यांपासून या विषयावर काम सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं.
राहुल गांधींना टोला
कधीकाळी टूजी, थ्रीजी आणि कोळसा घोटाळ्यात गुंतलेले लोकही आता पैशांसाठी रांगेत उभे असल्याचं म्हणत मोदींनी राहुल गांधी यांना टोला हाणला. काळ्या पैशाविरोधातील हल्लाबोल आणखी तीव्र करण्याचा इशारा देतानाच येत्या काळात बेहिशेबी मालमत्तेला टार्गेट करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 8 नोव्हेंबरच्या रात्री नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर कोट्यवधी नागरिक सुखाने झोपले, तर काही जण स्वतःच्याच विचारात बुडून गेले, असा टोलाही मोदींनी लगावला.
अर्ध्याहून अधिक नेत्यांचा विरोध
नोटाबंदीच्या निर्णयाला अर्ध्याहून जास्त नेत्यांचा विरोध होता, सोनंखरेदीसाठी पॅनकार्ड आवश्यक नको, अशी विनंतीही अनेक खासदारांनी केली. ज्यांना राजकारण करायचं आहे त्यांनी करावं, मात्र भ्रष्टाचार नष्ट करण्याची जबाबदारी सरकारवर असल्याचंही मोदींनी ठणकावून सांगितलं.
घरदार-संपत्तीचा देशासाठी त्याग
फक्त खुर्चीसाठी माझा जन्म झालेला नाही, देशासाठी मी माझं घरदार-कुटुंब, संपत्ती सगळं काही देशाला अर्पण केलं, असं सांगताना पंतप्रधान भावुक झाले. त्याचवेळी सत्ता टिकावी म्हणून भ्रष्टाचाराशी तडजोड करणार नाही, असंही मोदींनी खडसावून सांगितलं.
अनेक देशांसोबत काळ्या पैशाबाबत करार करण्यात आले आहेत. त्यामुळे काळा पैसा परदेशात जाताच तात्काळ माहिती मिळणार, अशी माहितीही त्यांनी दिली. विशेष म्हणजे मोदींच्या भाषणानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात उभं राहून त्यांचं अभिनंदन केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बातम्या
व्यापार-उद्योग
बातम्या
Advertisement