राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून तातडीची मदत मिळणार : मुख्यमंत्री
राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारकडून तातडीने मदत मिळावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली. पंतप्रधानांनही राज्याच्या या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर दोघांमध्ये चर्चा झाली. यावेळी फडणवीसांनी केंद्र सरकारकडून जलद मदतीची अपेक्षा व्यक्त केली. याव्यतिरिक्त दोघांमध्ये धारावी पूनर्विकास आणि रेल्वे समस्यांवरही चर्चा झाली. या भेटीसंदर्भातील माहिती आणि फोटो स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्वीट करुन दिली.
राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारकडून तातडीने मदत मिळावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली. पंतप्रधानांनही राज्याच्या या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दुष्काळ निवारणासाठी राज्य शासनाने केंद्राकडे 7 हजार 962 कोटी 63 लाखांच्या मदतीची यापूर्वीच मागणी केली असून ही मदत लवकर मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
या भेटीदरम्यान, धारावी पुनर्विकासासाठी रेल्वेची जमीन प्राप्त करण्याबाबतही चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन्ही विषयांबाबत दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.